नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील अनाधिकृत वृक्षतोडबाबत नाशिक महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडुन वेळोवेळी कारवाई केली जाते. सातपुर विभागातील आनंदवली शिवार अंतर्गत श्री गुरुजी हॉस्पीटल मागे असलेल्या निर्मल कॉलनी येथील सर्वे नं 25/1/1/2 प्लॉट नं 12 या ठिकाणी काशिद आणि गुलमोहर अशी दोन झाडे विनापरवानगी तोडल्याने चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
प्लॉटधारक महेश मिरजी, किरण वसावे, आनंदा बेंडकुळे, एकनाथ बेंडकुळी यांच्याविरोधात महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे जतन संवर्धन व अधिनियम 1975 मधील कायदयानुसार कलम 8 व 21 (1) अन्वये गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सातपुर उदयान विभागाचे उदयान निरीक्षक भविष्या निकम, जगदिश लोखंडे, आर. बी. सोनवणे, हेडमाळी श्रीकांत इरणक यांनी प्रत्यक्ष जागेवर जावुन समक्ष पाहणी केली.
त्यानंतर प्लॉटधारक महेश मिरजी यांना अनाधिकृत वृक्षतोड केल्याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे पथक वृक्षतोडीच्या घटनांकडे लक्ष ठेवीत आहे. ही मोहीम आता आणखी कडक केली जाणार आहे. मनपाच्या पश्चिम उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाकडुनही मागील महिन्यात विभागातील वेगवेगळया आठ ठिकाणी अनाधिकृत वृक्षतोडी बाबत आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच साडेसात लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. सातपूर विभागातही त्रंबक रोड भंदुरे मळा येथे झालेल्या वृक्षतोड प्रकरणी पाच लाख पाच हजार रुपये दंड भरून घेण्यात आलेला आहे.
शहरातील नागरीकांनी वृक्ष छाटणी आणि वृक्ष तोडण्या करीता मनपाच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडुन रितसर परवानगी घेऊनच पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे. अन्यथा महानगरपालिकेकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन मनपा उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे उप आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी केले आहे.
Nashik Anandvali Illegal Tree Cutting 4 Booked