नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमधून विमानसेवा देणाऱ्या अलायन्स एअर या कंपनीला राजकीय दबावामुळेच गाशा गुंडाळण्यास सांगण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेचे नाव पुढे केले जात असले तरी प्रत्यक्षात राजकीय दबावातूनच कंपनीला त्यांची सेवा बंद करावी लागत आहे.
एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअर या कंपनीद्वारे नाशिकच्या ओझर विमानतळावरुन गेल्या तीन वर्षांपासून सेवा देण्यात येत आहे. त्यात नाशिक-पुणे, नाशिक-अहमदाबाद, नाशिक-पुणे-बेळगाव आणि नाशिक-अहमदाबाद-नवी दिल्ली या सेवांचा समावेश आहे. मात्र, आता ३१ ऑक्टोबरपासून ही सेवा देता येणार नसल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. तसे पत्र कंपनीने विमानतळ प्रशासन असलेल्या हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) दिले आहे. तसेच, कंपनीकडून ३१ ऑक्टोबरपासून कुठलेही तिकीट बुकींग घेण्यात येत नाही. कंपनीने अचानक हा निर्णय का घेतला याबाबत आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाकडे विचारणा केली असता त्यांना उडान या योजनेच्या समाप्तीचे कारण देण्यात आले आहे. ज्या शहरांमध्ये विमानतळ आहे पण विमानसेवा नाही अशा शहरांमध्ये विमानसेवा सुरू व्हावी यासाठी उडान ही योजना सुरू करण्यात आली. ठराविक कालावधीत काही सोयी-सुविधा आणि सवलती देऊन तेथील विमानसेवा विकसीत झाल्यानंतर या योजनेचा लाभ संबंधित कंपनीला दिला जाणार नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, नाशिकची विमानसेवा आणि अलायन्स एअरच्या अचानक सेवा बंद करण्याची वस्तुस्थिती काही वेगळीच आहे.
काही निर्माण होणारे प्रश्न असे
– उडान योजनेचा लाभ, सवलती या ऑक्टोबर अखेरीस बंद होत असल्याचे अचानक कसे जाहीर झाले
– अलायन्स एअर कंपनीकडून एचएएललाही शेवटच्या क्षणी कळविले
– ट्रॅव्हल एजंट असोसिएशन, नाशिक यांच्या सभासदांना कुठलीही कल्पना देण्यात आलेली नाही
– सद्यस्थितीत नाशिक-पुणे आणि नाशिक-अहमदाबाद या सेवांसाठी एक तिकीट चक्क १८ ते २५ हजार रुपयांना विकले जात आहे. तरीही कंपनी ही सेवा का सुरू ठेवत नाही
– कंपनीला उडान योजना बंद होण्याची माहिती नव्हती का
– अलायन्स एअरने व्यावसायिक पद्धतीने सेवा सुरू राहण्याबाबत हिवाळी वेळापत्रकासाठी अर्ज का केला नाही
वरील सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली असता भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेशातील वजनदार नेत्याने ही सेवा बंद करण्याचे निर्देशित केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच नाशिकमधील सर्व लवाजमा घेऊन अलायन्स एअर आता तो इंदूर येथे नेणार आहे. तेथून विविध शहरांसाठीच्या सेवा दिल्या जाणार आहेत. राजकीय दबावामुळे अलायन्स एअरसुद्धा हतबल असल्याचे दिसून येत आहे. नाशिकमध्ये सलग गेल्या तीन वर्षांची मेहनत आणि सेवा दिल्यानंतर व्यावसायिक सेवेसाठी कंपनीला संधीही देण्यात आली नसल्याचे स्पष्ट होत आहे. वास्तविक नाशिकमध्ये व्यावसायिक सेवा देण्याची कंपनीची तयारी आहे. पण, राजकीय दबावामुळे कंपनीचे अधिकारी वा कर्मचाही काहीही बोलण्यास तयार नाहीत. या सर्व प्रकारात नाशिकचे प्रचंड नुकसान होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
Nashik Alliance Air Service Close Political Pressure