नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक येथील प्रसिद्ध हृदय शल्यचिकित्सक डॉ. प्रणव आशुतोष माळी यांच्या नेतृत्वाखालील वोक्हार्ट रुग्णालयातील कार्डियाक ऍनेस्थेसियोलॉजिस्ट डॉ. वर्षा कुलकर्णी, परफ्युजनिस्ट लक्ष्मण माने, विवेक पॉल आणि सहाय्यक समाधान यांचा समावेश असलेल्या त्यांच्या टीमने ही पहिली दुर्मिळ, आव्हानात्मक आणि अशा प्रकारची पहिलीच गुंतागुंतीची जागृत कार्डियाक सर्जरी यशस्वीपणे पूर्ण केली.
संगमनेर येथील ६३ वर्षांचे नामदेव पोपेरे यांना इंटरस्टिशियल लंग डिसीज (ILD) हा फुफ्फुसाचा आजार, इस्केमिक हृदयरोग आणि उच्च रक्तदाब, गंभीर ट्रिपल व्हेसेल डिसीज, तीव्र लेफ्ट वेंट्रिक्युलर सिस्टॉलिक डिसफंक्शनसह हृदयाची अत्यंत अशक्त पंपिंग असल्याचे टूडी इकोमध्ये निष्पन्न झाले होते.
श्री.पोपेरे यांना अस्थिर एनजाइना, श्वासोच्छवासाचा तीव्र त्रास असल्यामुळे दाखल करण्यात आले होते व त्यांना खोकल्याचा दीर्घ इतिहास होता. त्यांना बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला होता. एक्सरेद्वारे मध्य आणि खालच्या दोन्ही भागांमध्ये अनेक रेटिक्यूलर ओपॅसिटीज दिसून आल्या होत्या. तसेच खालच्या लोब्समध्ये दोन्ही बाजूंना कमी ल्युसेंट पोकळी आढळून आल्या. हे इंटरस्टिशियल फुफ्फुसाच्या आजाराचे संकेत होते. उच्च रिझोल्यूशनच्या सीटी थोरॅक्स करण्यात आलेल्या रुग्णामध्ये याची पुष्टी झाली. त्यातूनही रुग्णाला गंभीर इंटरस्टिशियल फुफ्फुसाचा आजार (ILD) असल्यावर शिक्कामोर्तब झाले. थुंकीची तपासणी करण्यात आली मात्र त्यातून क्षयरोगाचा धोका नसल्याचे सिद्ध झाले.
रुग्णाच्या खोलीतील हवेची विश्रांतीच्या वेळी संपृक्तता (सॅच्युरेशन) ९३ ते ९४ टक्के होती. ६ मिनिटांच्या चालण्याच्या चाचणीनंतर ही संपृक्तता सुमारे ८९ टक्के होती शिवाय श्वासोच्छवासाचा तीव्र त्रास होत होता. कोणत्याही कारणामुळे/ इडिओपॅथिक ट्रिगरिंगमुळे फुफ्फुसांना दुखापत झाल्यास इंटरस्टिशियल लंग डिसीज उद्भवतो असे दिसून येते. यामुळे एक असामान्य उपचार प्रक्रिया सुरू होते आणि हवेच्या पिशव्यांभोवती टिश्यूज तयार होतात. फुफ्फुसांमध्ये हळूहळू डाग पडतात, ते घट्ट होतात आणि तंतुमय बनतात आणि ते मागे सारता येत नाही. त्यामुळे रुग्णाच्या रक्तप्रवाहात ऑक्सिजन जाणे अधिक कठीण होते.
वोक्हार्ट हॉस्पिटलचे सर्वात ज्येष्ठ फिजिशियन डॉ. बस्ते म्हणाले, “अशा रूग्णांना फुफ्फुसातील उच्च रक्तदाब, उजव्या बाजूचे हृदय निकामी होणे आणि श्वसनक्रिया बंद पडणे यासारख्या जीवघेण्या गुंतागुंतींना सामोरे जावे लागू शकते.”
या केसबद्दल बोलताना कार्डियाक ऍनेस्थेसियोलॉजिस्ट डॉ. वर्षा कुलकर्णी, म्हणाल्या, “अशा रुग्णाला भूल देणे हे अत्यंत जोखमीचे आणि आव्हानात्मक काम असते. सर्व प्रयोगशाळा चाचण्या आणि इतर तपासण्या पाहता, सामान्य भूल देणे आणि रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवणे हा त्याला भूल देण्याचा नेहमीचा साधा- सरळ उपाय नसल्याचे दिसून आले.”
रुग्णाला समजणाऱ्या भाषेत शस्त्रक्रिया आणि भूलीची प्रक्रिया पूर्णपणे समजावून सांगण्यात आली. त्याच्या केवळ छातीच्या भागाला भूल देण्यासाठी केसांसारख्या एका कॅथेटरद्वारे सर्विकल स्पेसमध्ये ऍनेस्थेसियाची औषधे देण्यात आली. यामुळे ऑपरेशनच्या प्रक्रियेसाठी छातीचा संपूर्ण भाग संवेदनाहीन झाला. आणि रुग्ण जागृत, सजग आणि सर्वाना प्रतिसाद देत असताना संपूर्ण सीएबीजी (CABG) प्रक्रियेमध्ये सर्व वाईटल्स स्थिर असताना ओपनहार्ट बायपास शस्त्रक्रिया पार पडली. जागृत बायपास शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर नामदेव पोपेरे आणि त्यांच्या नातेवाईकांनी डॉ. प्रणव माळी आणि सर्व डॉक्टरांची टीम, रुग्णालयातील कर्मचारी आणि प्रशासनाचे आभार मानले.
nashik alive heart Surgery successful wokhardt hospital