नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात एका व्यक्तीने अनोखे आंदोलन सुरू केले आहे. तो चक्क अभिनेता अजय देवगणसाठी भीक मागत आहे. हो, वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अजय देवगणसाठी भीक का मागितली जात आहे आणि नाशकातली ती व्यक्ती कोण आहे. त्याचा उलगडा आपण आता करणार आहेत.
ऑनलाईन गेमिंग आणि त्याच्या जाहिरातींचा निषेध करण्यासाठी या व्यक्तीने नाशिकमध्ये भीक मांगो आंदोलन सुरू केले आहे. त्याच्या या आंदोलनाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरला झाला आहे. हा माणूस स्कूटर पार्क करुन लाऊड स्पीकरवर भीत मागत आहे. हे आंदोलन का करतो आहे हे तो सर्वांना लाऊडस्पीकरवर सांगत आहे. अभिनेता अजय देवगणकडे देवाच्या कृपेने खूप काही आहे आणि तरी तो ऑनलाईन गेमिंगला प्रोत्साहन देत आहे. त्याचा तरुणांवर वाईट प्रभाव पडतो आहे. म्हणूनच मी हे आंदोलन करीत असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
त्याचे हे आंदोलन सध्या चर्चेचा विषय बनले आहे. तसेच, यानिमित्ताने सर्वांना विचार करायला लावणारी त्याची मागणी आहे. अभिनेता अजय देवगणने अशा जाहिराती करणे थांबवावे. जर या अभिनेत्याला आणखी पैसे हवे असतील तर मी पुन्हा अधिक भीक मागेल व ते पैसे तुम्हाला पाठवेल. पण, कृपया अशा जाहिरातींना मान्यता देऊ नका, मी गांधी स्टाईलने ही विनंती करतो असेही तो सांगतो.
खरं तर ऑनलाईन गेमिंग असो की गुटखा याच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रेटींवर सोशल मिडियात जोरदार टीका केली जाते. चुकीच्या गोष्टीला हे सेलिब्रेटी प्रोत्साहन देतात. त्यामुळे अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. या सर्व घटनेचा सोशल मीडियावर नागरिक आपला राग व्यक्त करत असतातच पण, रस्त्यावर येऊन आपला संताप व्यक्त करुन गांधीगिरी करणारे हे आंदोलन मात्र निराळेच आहे. त्यामुळे याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.