विशेष प्रतिनिधी, नाशिक
नाशिककरांसाठी मोठी खुशखबर आहे. येत्या १२ जुलैपासून नव्या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा अलायन्स एअर या कंपनीने केली आहे. अलायन्स एअर ही सरकारी विमानसेवा कंपनी असलेल्या एअर इंडियाची उपकंपनी आहे. अलायन्स एअरद्वारे नाशिकहून पुणे, हैदराबाद आणि अहमदाबाद या तीन शहरांसाठी सेवा दिल्या जात होत्या. मात्र, कोरोना संसर्ग प्रादुर्भाव आणि निर्बंधांमुळे सध्या या तिन्ही सेवा बंद आहेत. आता येत्या १२ जुलै पासून कंपनी पुन्हा सेवा सुरू करीत आहे. त्यात कंपनीने मोठा दिलासा दिला आहे. अलायन्स एअर आता दिल्ली-अहमदाबाद-नाशिक आणि नाशिक-अहमदाबाद-दिल्ली अशी हॉपिंग फ्लाईट सुरू करीत आहे. या सेवेमुळे नाशिक हे एकाचवेळी दोन्ही शहरांशी जोडले जाईल. त्याचबरोबर नाशिक-पुणे या सेवेचा विस्तार करुन आता ती बेळगावपर्यंत नेली जाणार आहे. म्हणजेच, अलायन्स एअरकडून येत्या १२ जुलैपासून नाशिक-पुणे-बेळगाव अशी सेवा दिली जाणार आहे. १२ जुलैपासूनच्या या सेवा आठवड्यातील ५ दिवस म्हणजेच सोमवार ते शुक्रवार मिळणार आहेत. तर, शनिवार आणि रविवार कंपनीची कुठलीही सेवा नसेल. अधिक माहिती व तिकीट बुकींगसाठी website: https://www.airindia.in या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन कंपनीने केले आहे.









