नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओझर येथील नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागतिक पातळीवर घोषणा करण्यात आली आहे. शारजाह विमानतळ प्राधिकरणाने नाशिकला नवीन कार्गो वाहतूक ठिकाण (न्यू एअर कार्गो डेस्टिनेशन) म्हणून घोषित केले आहे. विशेष म्हणजे, शारजाहने जगातील एकूण ३ ठिकाणांची घोषणा केली आहे. त्यात नाशिकचा समावेश आहे. त्यामुळे नजिकच्या काळात ओझरहून व्यावसायिक हवाई मालवाहतूक सेवेला प्रचंड चालना मिळणार आहे.
शारजाह विमानतळ प्राधिकरणाने व्यावसायिक संबंधांना चालना देण्यासाठी आणि शारजा आणि यूएईच्या आर्थिक विस्तारात योगदान देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या विस्तार योजनांमध्ये नाशिकला एक नवीन हवाई मालवाहू ठिकाण म्हणून समाविष्ट केले आहे. शारजाह विमानतळ प्राधिकरणाने ह्यूस्टन (अमेरिका) आणि किगाली (रवांडा) यांच्यासह ओझर (नाशिक) या तीन ठिकाणांची घोषणा केली आहे. यामुळे नाशिकचे आर्थिक महत्त्व वाढण्याबरोबरच नाशिक विमानतळावरील कामकाजालाही मोठी चालना मिळणार आहे, असे मत हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी व्यक्त केले आहे.
ओजर विमानतळावरुन सध्या प्रवासी वाहतूक सुरू आहे. स्पाईस जेट आणि इंडिगो या दोन विमान कंपन्यांद्वारे सध्या देशांतर्गत सेवा दिली जात आहे. तसेच, हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि कॉनकॉर यांच्या संयुक्त विद्यमाने हॅलकॉन या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. हॅलकॉनद्वारे ओझर विमानतळावरुन कार्गो सेवा दिली जात आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ही सेवा सुरू आहे. आता शारजाह विमानतळ प्राधिकरणाच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा नाशिक विमानतळ जागतिक नकाशावर आले आहे.