नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान दररोज सकाळी गजबजलेले असते. काल रविवारी ( दि. २) येथे पहाटेपासून गर्दीचा ओघ वाढत गेला. तरुण – तरुणींचा उत्साह ओसंडून वाहत होता. मात्र वयोवृध्दही मागे न राहता अहिंसा रन मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. पाच हजारपेक्षा जास्त जणांनी सहभाग नोंदवत शांती आणि अहिंसेचा संदेश दिला. त्याबरोबरच स्वच्छ नाशिक, हरित नाशिक, सुंदर नाशिक याचाही जयघोष करीत प्रचार करण्यात आला. १० किलोमीटर रन मध्ये पुरुष गटात प्रथम- असिफ खान, द्वितीय- रोहित यादव व तृतीय- महेश फासले तर महिला गटात प्रथम- राणी मुछेडी, द्वितीय- स्तुती एडनवाला व तृतीय- ज्योती नागरे यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
आज संपूर्ण जगात हिंसाचार होत असतांना त्यावर अहिंसा हाच एकमेव प्रभावी उपाय मानला जातो. हिंसा ही केवळ शारीरिक नसून ती मानसिकही असू शकते आणि ती केवळ मानवजातीसाठीच नाही तर पशुपक्ष्यांचीही होते. प्रेम, क्षमा, त्याग ही सर्व अहिंसेचीच रूपे आहेत. जगाला भगवान महावीरांचा शांती आणि अहिंसेचा संदेश प्रसारित करण्यासाठी आयएफएएल जितोद्वारे भव्य “अहिंसा रन” चे आयोजन करण्यात आले. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथे सकाळी ६ वाजता प्रारंभ झाला.
३ किमी, ५ किमी आणि १० किमी असा मार्ग होता. प्रमुख पाहुणे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केवळ उपस्थित न रहाता ५ किमी रन मध्ये सहभाग घेत अनोखा संदेश दिला. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा परिषदेच्या विशेष कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे, शिक्षणतज्ज्ञ रतन लथ, हेमलता पाटील आदी मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी व उत्साह वाढविण्यासाठी उपस्थित होते.
स्पर्धेच्या सुरुवातीला झुंबा नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभाला व्यासपीठावर ज्येष्ठ उद्योजक अशोक कटारिया, सतिश पारख, सुमेरकुमार काला, नितीन ठाकरे,वर्धमान लुंकड, संजय लोढा, सतीश हिरण, नरेंद्र गोलिया, ऍड. सुबोध शहा, विलास शहा,संदीप पहाडे, हर्षित पहाडे, आशा कटारिया, शोभा पारख, पंकज पटनी आदी उपस्थित होते. जितो अध्यक्षा कल्पना पटणी यांनी स्वागत, प्रस्ताविक केले. सेक्रेटरी वैशाली जैन यांनी आभार मानले.
विशेष म्हणजे अहिंसा रन केवळ एक समुदायापुरती मर्यादित न ठेवता अहिंसेच्या बाजूने असलेल्या लोकांना स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले. याच दरम्यान जगातील सर्वाधिक शहरात ही रन झाल्याबद्दलचा जागतिक पुरस्कार हा नासिकमध्ये प्रदान करण्यात आला. सर्व स्पर्धकांना टी-शर्ट, मेडल,गुडी बॅग देण्यात आले. डॉ अतुल जैन,सौरव पारख, सुनीता बोहोरा, वंदना तातेड,विजय लोहाडे, निकेत चतुरमुथा, नितीन राका यासह मोठ्या संख्येने स्वयंसेवकांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे जोशपूर्ण सूत्रसंचालन परी ठोसर – जोशी व रोहन मेहता यांनी केले. असाच उपक्रम काल याच वेळेत विविध शहरात करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मैदानावर प्रथमोपचार केंद्र, माहिती कक्ष यांची व्यवस्था करण्यात आली होती.
उत्स्फूर्त सहभाग,ज्येष्ठांचा समाजापुढे आदर्श
या उपक्रमात ३ किलोमीटर स्पर्धेत सुमारे ३५००, ५ किलोमीटर स्पर्धेत १००० तर १० किलोमीटर स्पर्धेत ८०० अश्या एकूण ५ हजारपेक्षा जास्त स्पर्धकांचा सहभाग नोंदविला. जीतो नाशिकचे अध्यक्ष ऍड. सुबोध शहा, सौ. कल्पना पटणी, हर्षित पहाड़े यांनी सर्वांचे स्वागत केले. “अहिंसा रन” चे मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्सचे दीपक चंदे व सहप्रायोजक आर.सी. बाफना ज्वेलर्स, स्पेक्ट्रम क्लासेस होते.
स्पर्धेला गोल्फक्लब येथून सुरुवात होऊन ३ कि.मि. सिबल हॉटेल, ५ कि.मी. एबीबी सर्कल व १० कि.मी. सातपुर अश्या तीन्ही स्पर्धांचा समारोप गोल्फक्लब येथेच झाला. विशेष म्हणजे ९१ वर्षांचे रामचंद्र बधान व ८५ वर्षांचे नारायण वाळवेकर यांनी ३ किलोमीटर रन पूर्ण केला तर ८५ बाळकृष्ण अलई यांनी तब्बल १० किलोमीटर ‘अहिंसा रन’ पूर्ण करून समाजापुढे आगळावेगळा आदर्श निर्माण केला. या तिघांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
Nashik Ahimsa Run 5 Thousand Participants