इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– व्हिजन नाशिक – भाग ५
ॲग्रो टुरिझम – बॅक टू द रूट्स
नाशिक जिल्हा “कृषी पर्यटनाची” राजधानी
भारतामध्ये शहरीकरण अतिशय वेगाने वाढत असून काँक्रेटचे जंगल वाढत चालले आहे. आज प्रत्येक मोठ्या शहरांत रंगबिरंगी काचेचे आवरण असलेल्या मोठमोठ्या वातानुकूलित बिल्डींग्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, चित्रपटगृहे, सिमेंट काँक्रिटचे रस्ते, सर्व अत्याधुनिक सोयी आणि सुविधा आहेत. तरीपण हजारो माणसे ताण-तणाव आणि विविध आजारांनी ग्रस्त का होत आहेत? बऱ्याचदा शहरातील ह्या धावपळीच्या जीवनात क्षणभर विश्रांती साठी छोटेसे उद्यान किंवा साधं एक बहरलेलं झाड हि लवकर नजरेस पडत नाही. मोठ्या शहरांमधील दगदगीच्या आयुष्यामध्ये, २०१९ च्या उत्तरार्धात अचानक उद्भवलेल्या करोना महामारी आणि पाठोपाठ आलेल्या लॉकडाउन संकटामुळे मानसिक ताण तणावामध्ये आणखीनच भर घातली होती.
मानव हा निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहे. परंतु आधुनिक जीवनशैलीमुळे शहरातील माणसांची निसर्गासोबत जोडलेली नाळ तुटत चालली आहे. शहरातील माणसे कितीही सोयीसुविधांमध्ये राहत असतील तरीही त्यांना नेहमी निसर्गाचं आणि ग्रामीण जीवनाचं आकर्षण असतेच. सर्वांनाच निसर्गाच्या सानिध्यात राहायला नेहमी आवडते आणि त्यासाठी ते हजारो रुपये खर्च करायला देखील तयार असतात. शहरीकरणाचे मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागात असलेल्या रोजगाराच्या मर्यादित संधी आणि शेतीला नसलेले ग्लॅमर. ह्यावर उपाय तरी काय?
“कृषी पर्यटन” म्हणजे ‘कृषी’ आणि ‘पर्यटन’ या दोन विषयांची एकत्रीतपणे केलेली नैसर्गिक गुंफण, समृद्ध शेती आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी असलेला हा राजमार्ग. शहरातील पर्यटकांना बोलावून आपली शेती, ग्रामीण जीवन, संस्कृती, प्रदूषणमुक्त आणि निसर्गसंपन्न पर्यटनाचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना देणे, जसे कि गावाकडील लोकांचे राहणीमान, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, शेती कशी केली जाते, स्थानिक क्षेत्रात कोणकोणती पिके घेतली जातात, स्थानिक परंपरा, ग्रामीण खाद्य संस्कृतीची माहिती देणे, चुलीवरचे जेवण, हुर्डापार्टी, पारंपरिक खेळ, लोकगीत, संगीत, नृत्य, लोककला, अशा प्रकारचे अनेक नवनवीन अनुभव तुम्ही या शहरी लोकांना देऊ शकता आणि त्या बदल्यात ह्या कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाची संधी उपलब्ध होते.
कृषी पर्यटनाचा उद्देश मनोरंजनासह कृषी उत्पादनांची ओळख आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा होय. कृषी पर्यटन केंद्रांमुळे गावातील महिला बचत गट, युवक, कारागीर, कलाकार यांना सुद्धा रोजगार उपलब्ध होतो. शेतीवर आधारित पूरक व्यवसायाचे जाळे निर्माण करून ग्रामीण भागातील राहणीमान उंचावणे. कृषी पर्यटन केंद्रांमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सहली, त्याच बरोबर जेष्ठ नागरिक, महिला मंडळे यांच्या सहली, कोर्पोरेट कंपनीच्या मिटिंग हि आयोजित करता येवू शकतात, त्याद्वारे पर्यटकांना निसर्ग, शेती, फलोत्पादन, ग्रामीण जीवन, खाद्यसंस्कृतीची ओळख होऊन शेतीच्या विविध पैलूंचे दर्शन व अनुभव घेता येते.
शहरापासून जवळच असलेल्या ह्या कृषी पर्यटन केंद्रांमुळे पर्यटक प्रदूषण मुक्त नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेऊन पुन्हा ताजे तवाने होऊन आपल्या शहराकडे जाऊ शकतात. कृषी पर्यटना मुळे शहरी व ग्रामीण भागामधील दरी कमी होण्यास मदत होते. महाराष्ट्र हे कृषी पर्यटन सुरु करणारे भारतातील पहिलेच राज्य आहे. कृषी पर्यटनास शासनाकडून बरेच लाभ मिळतात, जसे कि कृषी पर्यटन केंद्रास पर्यटन विभागाकडून मिळणारे नोंदणी प्रमाणपत्र, या नोंदणी पात्राच्या आधारे तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळू शकते. ग्रीनहाऊस, फळबाग, भाजीपाला लागवड यांसारख्या योजना आणि त्याच बरोबर प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देखील मिळते.
नाशिक मध्ये इ. स. १८७८ मध्ये स्थापन झालेल्या “श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ” च्या चुंचाळे-बेळगाव ढगा येथील जैवविविधता झोन, पर्यटन संचालनालयाने नोंदणीकृत/अधिकृत केला आहे. उपरोक्त जैवविविधता झोनमध्ये पर्यावरण, जैवविविधता, सेंद्रिय शेती इत्यादींशी संबंधित प्रकल्प अहवाल, प्रबंध, संशोधन अहवाल, अभ्यास दौरा इत्यादीसाठी विशेष परवानगी देण्यात येते. “श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ” गौशाळेत आज हजारो गायीचे पालन पोषण करण्यात येते. ७५० एकर मध्ये असलेल्या प्रमाणित सेंद्रिय फार्म, सुमारे अडीच लाख झाडे, विविध फुले, फळे, पक्षी, प्राणी, जैवविविधता झोन, जलसंधारण प्रकल्प, वर्मी कंपोस्ट प्रकल्प, मधमाशी पालन प्रकल्प, सौरऊर्जा प्रकल्प. ४५० किलोवॅट क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प, औषधी वनस्पती, दुर्मिळ वृक्ष प्रजाती, गोशाळा (डांगी व इतर गायी), लहान मुलांसाठी खेळण्याची जागा आणि झूले, कबड्डी, खो-खो, लंगडी आदी देशी खेळ या झोनमधील आकर्षणाचे केंद्र आहेत.
पिंपळगाव (नाशिक) च्या बसवंत गार्डनने औद्योगिक पर्यटनासह कृषी उद्योग पर्यटन केंद्र, आदर्श गांव-सेवरगांव ग्राम संस्कृती केंद्र, फळे-भाजीपाला प्रक्रिया केंद्र, मनुका प्रक्रिया केंद्र, मध प्रक्रिया केंद्र, चॉकलेट फॅक्टरी, लहान मुलांसाठी गेम झोन तसेच महाराष्ट्रात प्रथमच मधमाशीवर आधारित पर्यटन म्हणजेच “ऐपी टुरिझम”, मधमाशी उद्यान (हनी बी पार्क) आणि प्रशिक्षण केंद्र सादर केले आहे. मोहाडी (ता. दिंडोरी) येथील नामवंत सह्याद्री फार्म्स कृषी पर्यटन केंद्रामध्ये पर्यटकांना भारतातील सर्वात मोठ्या फळे, भाजीपाला प्रक्रिया आणि पॅकेजिंग केंद्र पाहण्याची संधी मिळते तसेच प्रत्यक्ष शेती मध्ये जाऊन अनुभव घेण्याची आणि कृषी तज्ञांशी बोलून शेती विषयी ज्ञान वाढविण्याची संधी मिळते.
आपले नाशिक म्हणजे मिसळ-पाव प्रेमी खवैयांचे माहेरघर, येथील प्रसिद्ध चुलीवरची झणझणीत मिसळ, सेंद्रिय गुळाची जिलेबी, केसर बाग, द्राक्ष बाग, किंवा पेरूच्या बागेत बसून मिसळ-पाव/ भाकरी, महाराष्ट्रीयन थाळी आणि ग्रामीण खाद्यसंस्कृती चा आनंद देणारी बरीच प्रसिध्द ठिकाणे आहेत. ह्यापैकी अनेक ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात बसून जेवणाचा आनंद तर आहेच शिवाय पर्यटकांसाठी बैल गाडी सवारी, ऊंट सवारी, घोडे सवारी, टॉय ट्रेन, लहान मुलांना खेळण्यासाठी चिल्ड्रन पार्क असं बरंच काही समाविष्ट आहे.
संस्कृती ऍग्रो टुरिझम संचलित मामाचा मळा हे आपल्या नाशिक मधील एक प्रसिद्ध कृषी पर्यटन केंद्र आहे. सात एकर जागे मध्ये वसलेल्या ह्या केंद्रात जवळपास २००० विविध प्रकारची झाडी लावलेली आहेत व त्याच बरोबर जुनी विहिर, शेत तळे असा हा देखावा कोकणवाडी येथे केलेला आहे. निर्मल कृषी पर्यटन येथे नाशिक मधील पहिले “बर्ड पार्क” असून स्थानिक आणि परदेशी पक्ष्यांच्या सुमारे २०० प्रजातींच्या हजारो पक्ष्यांचे निवासस्थान आहे. अंजनेरी (त्र्यंबकेश्वर) येथील चाणक्य कृषी पर्यटन केंद्र येथे पर्यटकांसाठी जंगल सफारी, पक्षी निरीक्षण, वनस्नान, योग आणि ध्यान केंद्र, रेन डान्स, चिल्ड्रन्स पार्क, इनडोअर आणि आउटडोअर अॅक्टिव्हिटी सेंटर सारख्या सुविधा देण्यात येतात.
नाशिक जिल्ह्यातील, नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य जवळ असेलेले, कोथुरे (ता. निफाड) येथील रमेश मोगल एका रासायनिक कंपनीत नोकरीत असतांना एलेर्जी विषयी समस्या उत्पन्न झाल्याने गावी परतले. चांगल्या पगाराची नोकरी सोडून पारंपरिक शेतीवर उपजीविका करणे आव्हानात्मक होते. मात्र काळाची गरज ओळखून त्यांनी फलोत्पादनाची कास धरली, कृषी पर्यटन व्यवसाय सुरु केला आणि आज याच व्यवसायातून आर्थिक सक्षमता, पारिवारिक आनंद, ग्राहकांचे समाधान मिळवून आपल्या शेतीचा विकास हि केला. गाव शिवारात दुर्दम्य इच्छा शक्तीच्या बळावर कल्पनाशक्तीला वाव देत त्यांनी सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी आदर्श उदाहरण समोर ठेवले आहे.
आज संपूर्ण जगासमोर जागतिक तापमानवाढ, हवामान बदल (ग्लोबल वॉर्मिंग), अन्न निर्मिती, अन्न सुरक्षा, जैव विविधता, गरीबी, भूकबळी सारख्या अनेक समस्या आहेत. आपल्या सर्वांवर निसर्ग जपण्याचे आणि आपली शेती, माती व पाणी संवर्धन करण्याचे मोठे आव्हान आहे. निसर्ग संपन्नतेची जोड देऊन कृषी पर्यटन सुरु केल्यास त्यामधून नव्या पिढीला देखील शेती विषयी जिव्हाळा आणि आवड निर्माण होते. कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांना व्यावसायिक प्रतिष्ठा मिळू शकते. कृषी पर्यटनाद्वारे शेतकर्यांना शेतीच्या कार्याचा विस्तार करण्याची संधी असून शेतीच्या उत्पन्नात वाढ होते. परिणामी स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या विविध कृषी मालाबद्दल देखील जागरूकता वाढते. ग्राहक बाजारपेठेचा विकास होऊन रोजगार निर्मितीस हातभार सुद्धा लागतोच.
ग्रामीण परिसरातील पर्यावरणनाचे आणि कृषि संस्कृतीचे जतन व संवर्धन होते. कृषी पर्यटन केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून शहरी पर्यटकांचा कृषी व ग्रामीण पर्यटनाकडे मोठा कल आहे. कोरोना महामारी पाठोपाठ आलेल्या लॉक डाउन आणि “वर्क फ्रॉम होम” संस्कृतीमुळे सर्वांच्याच जीवनात बदल आलेला असून, आरोग्य विषयी जागरूकता, मानसिक ताण-तणाव रहित जीवन, नैसर्गिक राहणीमान, सुरक्षित अन्न, सेंद्रिय शेती, पारिवारिक सुरक्षा इत्यादी गोष्टींविषयी जागरूकता नक्कीच वाढलेली आहे. कृषी पर्यटन हे शाश्वत विकासाचे “विन-विन बिझनेस मॉडेल” आहे.
आपल्या नाशिकला आल्हाददायी वातावरण, मुबलक पाणी, धरणे, ट्रेकर्स ना खुणावणारी डोंगरे, धबधबे, पुरातन मंदिरे, गड, किल्ले, अश्या अनेक गोष्टींचे वरदान असून परिसरातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती सोबतच “कृषी पर्यटन” धोरण स्वीकारले तर नाशिक जिल्हा “कृषी पर्यटनाची” राजधानी सुद्धा होऊ शकतो.
पियुष सोमाणी, विशाल जोशी (सहलेखक)
आपल्या सूचना, अभिप्राय आणि प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.
Email ID: visionnashik@esds.co.in
WhatsApp: 9011009700
Nashik Agriculture Tourism Vision Development by Piyush Somani