नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतीमध्ये फळे आणि भाजापाला उत्पादनात भावातील चढ उतार व निसर्गाच्या असमतोलामुळे होणारे पिकांचे नुकसान याचा शेतकऱ्यांना नेहमीच फटका बसत आला आहे. ही परिस्थिती पाहता काढणी पश्चात व्यवस्थापन आणि मुल्यवर्धन या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत हे आढळून आले आहे. हा विचार करता सोलर ड्रायर सारखा पर्याय आवश्यक ठरतो. सह्याद्री फार्म्स आणि सस्टेन प्लस (टाटा ट्रस्टचा उपक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने सोलर ड्रायरचा प्रायोगिक प्रकल्प मागील वर्षी हाती घेण्यात आला. यामध्ये 500 किलो क्षमतेचे 20 सोलर टनेल ड्रायर उभारण्यात आले. यासाठी सस्टेन प्लस (टाटा ट्रस्टचा उपक्रम) यांच्याकडून प्रति ड्रायर 65 टक्के आर्थिक साह्य व उर्वरित 35 टक्के आर्थिक भार शेतकऱ्यांनी उचलला. या माध्यमातून एकूण 20 सोलर टनेल ड्रायर उभारण्यात आले. या माध्यमातून शेतकऱ्यांना 20 लाखाचे आर्थिक साह्य मिळाले. यासर्व ड्रायरची उभारणी इंदोरस्थित रहेजा सोलार या संस्थेमार्फत करण्यात आली. सोलर ड्रायर उभारणीनंतर शेतकऱ्यांना सह्याद्री फार्म्स व रहेजा सोलर यांच्या मार्फत उत्पादन प्रशिक्षण देण्यात आले.
मागील वर्षभरात या शेतकऱ्यांनी द्राक्ष पिकातून बेदाणा निर्मिती, टोमॅटोपासून सुकलेले काप तसेच मागील मार्च महिन्यापासून कांद्यापासून सुकविलेल्या कांद्याची निर्मिती करीत आहे. यामध्ये टोमॅटो व कांदा पिकांमध्ये घसरलेल्या भावाच्या परिस्थितीत सोलर ड्रायर च्या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा वेगळा पर्याय निर्माण होऊ शकला. या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आतापर्यंत जवळपास 5 टन बेदाणा, 2 टन टोमॅटो व 10 टन कांदा या उत्पादनांची यशस्वीरित्या प्रक्रिया केली आहे. प्रक्रिया केलेल्या मालाची खरेदी रहेजा सोलार्स मार्फत केली जात आहे. या प्रयोगाची प्रायोगिक तत्वावर झालेली उभारणी व त्याला मिळालेले यश पाहता नवीन शेतकरी या ड्रायर उभारणीसाठी आग्रही आहेत. यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया योजनेंतर्गत तसेच सस्टेन प्लस (टाटा ट्रस्टचा उपक्रम) यांच्यामार्फत नवीन शेतकऱ्यांना सोलर ड्रायर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
‘‘द्राक्ष काढणीनंतर उरलेल्या मण्यांना प्रक्रिया केल्यामुळे अधिकचा भाव मिळू शकला. पुर्वी आम्ही फक्त मणी व्यापाऱ्यांना विक्री करायचो. परंतू आता सोलार ड्रायर मुळे चांगल्या दर्जाची बेदाणा निर्मिती करुन त्यातून मुल्यवर्धन झाले व त्यामुळे नेहमीपेक्षा चांगला दरही मिळाला. तसेच उत्पन्नाचा एक वेगळा मार्ग तयार झाला. ‘‘
–महेंद्र सुरवाडे, खतवड, ता. दिंडोरी, जि. नाशिक
‘‘सस्टेन प्लसच्या सहकार्याने आम्ही सोलर ड्रायर व सोलर पंप यांचा प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प राबविला. यातून अपारंपारिक उर्जेचा वापर शेतीसाठी करतांना सोलर पंप व सोलर ड्रायर शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिले. यामध्ये मुल्यवर्धन करुन काढणी पश्चात होणारे वेस्टेज यावर नियंत्रण आणता आले. यातून शेतमालाचे दर पडण्याच्या काळात पर्यायी व्यवस्था नक्कीच उभी राहू शकेल.‘‘
-विलास शिंदे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सह्याद्री फार्म्स, मोहाडी
सह्याद्री फार्म्सच्या शेतकऱ्यांच्या शेतात सस्टेन प्लस (टाटा ट्रस्टचा उपक्रम)च्या माध्यमातून 90 सोलर पंप बसविण्यात आले. यामध्ये सस्टेन प्लस कडून 60 टक्के आर्थिक साह्य प्राप्त झाले. या द्वारे शेतकऱ्यांना विस्कळीत लोड शेडींगच्या समस्येवर मात करता येणे शक्य झाले आहे. तसेच त्यांच्या पिकांवर होणारा परिणाम व त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळणे शक्य झाले.