नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भरधाव अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने झालेल्या अपघातात जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात मातोरी ते मखमलाबाद रोडवर झाला होता. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नामदेव नारायण होडे (५७ रा. वरचा कोळीवाडा गिरणारे) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. होडे गेल्या शनिवारी (दि.१७) सकाळी अकराच्या सुमारास मातोरीकडून मखमलाबादच्या दिशेने आपल्या अॅक्टीव्हावर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. आम्रपाली हॉटेल परिसरात अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना हुलकावणी दिल्याने ते पडले होते. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती.
मुलगा सचिन होडे यांनी त्यांना तातडीने गंगापूररोड वरील प्राईम हॉस्पिटल येथे दाखल केले होते. उपचार सुरू असतांना शुक्रवारी (दि.२३) डॉ. आनंद सराफ यांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.