नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– धावत्या दुचाकीवरून पडल्याने दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू झाला. वेगवेगळया ठिकाणी या घटना घडल्या असून याप्रकरणी पंचवटी आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हिरावाडीत राहणारे प्रकाश दर्यानोमल मखीजा (५७ रा.साई टॉवर हिरावाडी) हे गेल्या शनिवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास पंचवटीतून आपल्या दुचाकीवर घराकडे प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. पांजरापोळ परीसरात धावत्या दुचाकीवर चक्कर आल्याने ते पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांना सदगुरू हॉस्पिटल मार्फत अपोलो रूग्णालयात दाखल केले असता बुधवारी (दि.२६) उपचार सुरू असतांना डॉ. मृणाल चौधरी यांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
दुसरी घटना दिंडोरीरोडवरील शुभेच्छा लॉन्स भागात घडली होती. या घटनेत सुनिल प्रकाश गांगुर्डे (रा.लक्ष्मीनगर दिंडोरीरोड) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. गांगुर्डे मंगळवारी (दि.२५) पहाटेच्या सुमारास दिंडोरीकडून नाशिकच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना शुभेच्छा लॉन्स भागात ते पडले होते. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने बापू कोल्हाटे यांनी तातडीने प्लॅटिनीअम हॉस्पिटल येथे दाखल केले असता बुधवारी उपचार सुरू असतांना डॉ. तुषार गांगुर्डे यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार बाराईत करीत आहेत.