नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरधाव खासगी बसने दिलेल्या धडकेत ३३ वर्षीय पादचारी ठार झाला. हा अपघात नाशिक पुणे रोडवरील पळसे शिवारात झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
विलास भाऊसाहेब सहाणे (रा.बेंदमळा, पळसे ता. जि. नाशिक) असे मृत पादचारी तरूणाचे नाव आहे. सहाणे मंगळवारी (दि.११) सायंकाळच्या सुमारास पळसे गावाकडे जात असतांना हा अपघात झाला. एच.पी.पेट्रोलपंपासमोरून तो नाशिक पुणा महामार्ग ओलांडत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात ट्रव्हल्सच्या बसने त्यास धडक दिली.
या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने १०८ अॅम्ब्युलन्सने तातडीने जयराम हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ. आरती कनोजीया यांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत भाऊसाहेब सहाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पसार झालेल्या अज्ञात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेळके करीत आहेत.
तबेल्यातील घोड्याला मारले
तबेल्यात बांधलेल्या घोड्यास कुणी तरी विषारी औषध खावू घातल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना खडकाळी भागात घडली. आर्थिक नुकसान करण्याच्या हेतूने हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप घोडा मालकाने केला असून याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुलताना जाकिर शेख (रा.वडाळारोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शेख यांचा खडकाळी भागातील पाटकरी लॉज समोर तबेला आहे. या तबेल्यात बांधलेल्या पांढऱ्या घोड्यास कुणी तरी काही तरी विषारी पदार्थ खाऊ घातल्याने त्यास विषबाधा झाली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला. आर्थिक नुकसान व्हावे या हेतून हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप शेख यांनी केला असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार भोळे करीत आहेत.
Nashik Accident Private Bus Pedestrian Death