नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- देवदर्शनासाठी रस्त्याने पायी जाणा-या महिलेस दुचाकीने धडक दिल्याची घटना छत्रपती संभाजीनगर मार्गावरील लाखलगाव शिवारात घडली. या घटनेत जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शोभा राजाराम कारे (४० रा.सोनगाव ता.निफाड) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत मुलगी अंकिता कारे यांनी फिर्याद दिली आहे. कारे मायलेकी गेल्या मंगळवारी (दि.१२) अंगारकी चतुर्थी निमित्त गावातील काही महिलांसमवेत ओढा येथील गणपती मंदिरात देवदर्शनासाठी जात असतांना हा अपघात झाला होता. चांदूरीकडून छत्रपती संभाजीरोडने महिला रस्त्याच्या कडेने पायी जात असतांना लाखलगाव शिवारातील पाण्याच्या टाकीजवळ पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच २० डीक्यू ५३७८ या पल्सरने शोभा कारे यांना जोरदार धडक दिली होती.
या अपघातात कारे जखमी झाल्या होत्या. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.