नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या ७१ वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला. सिडकोतील त्रिमुर्तीचौक परिसरात भरधाव अॅटोरिक्षाने कट मारल्याने दुचाकीस्वार वृध्द दांम्पत्य जखमी झाले होते. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चित्रा निंबा धामणे (७१ रा. साईराज रेसि. राका कॉलनी) असे मृत वृध्देचे नाव आहे. याबाबत मुलगा मनोज धामणे यानी फिर्याद दिली आहे. निंबा धामणे व चित्रा धामणे हे दांम्पत्य गेल्या १७ जून रोजी सकाळच्या सुमारास नातेवाईकांच्या तेराव्याच्या कार्यक्रमानिमित्त खुटवडनगर येथे जात असतांना हा अपघात झाला होता.
एमएच १५ डीडब्ल्यू ६८२४ या दुचाकीने धामणे दांम्पत्य प्रवास करीत असतांना उंटवाडी ते त्रिमुर्तीचौक दरम्यानच्या खेतवाणी लॉन्स परिसरात पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच १५ जेए ४०७१ या अॅटोरिक्षाने दुचाकीस कट मारला. या घटनेत दाम्पत्य रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यातील चित्रा वाघ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक झेंडे करीत आहेत.