नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार झाली. हा अपघात छत्रपती संभाजी नगर रोडवरील पांजरापोळ भागात झाला होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चारचाकी चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद राजू कानडे (रा.जोशीवाडा,हिरावाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चारचाकी वाहनावरील संशयित चालकाचे नाव आहे. याबाबत भास्कर पोपट बर्वे (रा.माऊली मळा,माडसांगवी ता.जि.नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. बर्वे यांच्या पत्नी ज्योती भास्कर बर्वे (३८) या रविवारी (दि.१३) छत्रपती संभाजीनगर रोडने माडसांगवीच्या दिशेने आपल्या मोपेड दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता.
सीएनजी डेपो भागातील पांजरापोळच्या गेट समोर नांदूरनाक्याकडून भरधाव येणा-या एमएच १५ ईपी ६७९३ या चारचाकीने दुचाकीस धडक दिली होती. या अपघातात बर्वे या गंभीर जखमी झाल्याने त्यांना परिसरातील सुधर्म रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मध्यरात्री उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. या अपघातात मोपेडचेही मोठे नुकसान झाले असून अधिक तपास जमादार जाधव करीत आहेत.