नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत डबलसिट प्रवास करणारे दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले. हा अपघात महामार्गावरील डी मार्ट भागात झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
अंकुश भागवत काकडे (२३ रा. मोरेश्वरनगर, पाथर्डी शिवार) व स्वप्नील संजय शिंदे (२७ रा. पाथर्डी शिवार) अशी मृत युवकांची नावे आहे. काकडे व शिंदे हे दोघे मित्र रविवारी (दि.२८) पहाटेच्या सुमारास महामार्गावरून आपल्या अॅक्टीव्हा दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. मुंबईकडून दोघे नाशिकच्या दिशेने प्रवास करीत असतांना डी मार्ट परिसरातील घंटागाडी पार्किंग भागात अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिली.
या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. १०८ अॅम्ब्युलन्सने त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत एमआयडीसी चौकीचे अंमलदार सुरेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भंडे करीत आहेत.