नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहर व परिसरात अपघाताची मालिका सुरू असून वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमधील दोन मोटारसायकल स्वारांचा सोमवारी (दि.२२) मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकरोड व अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार चेहडी येथील संतोष व्यंकप्पा कट्टीमनी (४४ रा.साईचरण रो हाऊस,भगवा चौक,चेहडी) हे गेल्या गुरूवारी (दि.१८) घरपरीसरातील भगवा चौकातून दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. दुचाकी अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना बिटको रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी उपचार सुरू असतांना डॉ. पवन शिंदे यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.
दुसरा अपघात महामार्गावरील आडगाव शिवारात झाला होता. दशरथ बाळू निंबाळकर (४९ रा.क्रांतीचौक,गंगापूरगाव) हे बुधवारी (दि.१७) आडगाव शिवारात गेले होते. रात्रीच्या सुमारास ते महामार्गावरून आडगाव पोलीस ठाण्याच्या दिशेने प्रवास करीत असतांना डी मार्ट भागात अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने कुटुंबियांनी त्यांना आडगाव मेडिकल कॉलेज मार्फत सोहम हॉस्पीटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना सोमवारी डॉ. हर्षल पाटील यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास देवरे करीत आहेत.