नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरात अपघातांची मालिका सुरू असून, वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दोन पादचारींचा मृत्यू झाला. त्यात ३० वर्षीय युवकासह ६० वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी व सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
मखमलाबादरोड भागातील अमर गणपत निकम (३० रा.पार्वती एनएक्स बिल्डींग, वडजाईमातानगर) हे गेल्या मंगळवारी (दि.२) रात्री फडोळ मळयातील ठक्कर पॅरेडाईस पाठीमागून पायी जात असतांना हा अपघात झाला होता. पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. भाऊ सागर निकम यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत हवालदार शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
दुसरा अपघात सातपूर कॉलनीतील मौले हॉल भागात झाला होता. एमएच ४१ बीएन ९३९३ या बुलेटने धडक दिल्याने अशोक संतू आहेर (६०रा. बंदाणे गल्ली सातपूरगाव) हे वृध्द गंभीर जखमी झाले होते. हा अपघात रविवारी (दि.७) रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास समाधान देवरे यांच्या संपर्क कार्यालयासमोर झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या आहेर यांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी मुलगा अमोल आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात दुचाकीचालक धिरज भगवान जाधव याच्याविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक बटुळे करीत आहेत.