नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहर परिसरात अपघाताचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वार जखमी झाले. या घटनेत मोटारसायकलींचेही मोठे नुकसान झाले असून याप्रकरणी इंदिरानगर व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पाथर्डी शिवारातील अशोक नारायण सुर्यवंशी (रा.साई सिध्दी रो हाईस दामोदर चौक) हे बुधवारी (दि.२३) रात्री पाथर्डी फाट्याकडून दुचाकीवर आपल्या घराकडे जात असतांना हा अपघात झाला.
आरके लॉन्स भागात पाठीमागून भरधाव आलेल्या स्कोडा कारने एमएच ०२ एके ६०६२ दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात सुर्यवंशी जखमी झाले आहेत. याप्रकरणी मुलगा हरिष सुर्यवंशी याने दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात कारचालक अर्जुन लालचंद यादव (रा.राजीवनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत. दुसरा अपघात नाशिकरोड येथील लॅमरोड भागात झाला. सोहिल इश्तीयाक सय्यद (२२ रा.जामदार चाळ शाहूपथ गोसावीवाडी) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे.
सोहिल सय्यद हा युवक गेल्या रविवारी (दि.२०) रात्री एमएच १५ जेयू ३७८६ ही मोपेड घेवून आपल्या घराकडे जात असताना हा अपघात झाला. दुर्गा गार्डन भागातून तो प्रवास करीत असताना मकरंद अॅटोमोबाईल दुकानासमोर पाठीमागून भरधाव येणा-या अज्ञात काळ्या रंगाच्या चारचाकीने दुचाकीस धडक दिली. या अपघातात तो जखमी झाला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चारचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.