नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव दुचाकी घसरल्याने २५ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. नाशिकरोड येथील उड्डाणपूलावर हा अपघात झाला. या अपघातात पाठीमागून येणा-या कंटेनरचे चाक युवकाच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा चेंदामेंदा झाला होता. याप्रकरणी पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
समीर मोहन दाते (रा.संभाजीनगर,सिन्नरफाटा) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. दाते बुधवारी (दि.२३) दत्तमंदिरकडून सिन्नरफाटाच्या दिशेने आपल्या मोपेड दुचाकीवर प्रवास करीत होता. नाशिकरोड उड्डाणपूलावरून तो प्रवास करीत असतांना भरधाव दुचाकी घसरल्याने ही घटना घडली.
दुचाकीवरून रस्त्यावर पडताच पाठीमागून येणा-या एचआर ४५ ई ४१९० या कंटेनरचे चाक समीरच्या डोक्यावरून गेले. डोक्याचा चेंदामेंदा झालेल्या अवस्थेत त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.