नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात अपघाताचे सत्र सुरूच असून, वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू झाला. त्यातील एकाचा दुचाकी घसरल्याने तर युवकाचा भरधाव मोटारसायकल झाडावर आदळल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड व उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रामजी नामदेव नवले (६८ रा.विल्होळी ता.जि.नाशिक) हे गेल्या शनिवारी (दि.२८) आपल्या दुचाकीने पाथर्डी फाट्याकडून मुंबईनाक्याच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. लेखा नगर परिसरातील स्पिडब्रेकरवर भरधाव दुचाकी घसरल्याने ते पडले होते. या घटनेत डोक्यास दुखापत झाल्याने त्यांना तातडीने नजीकच्या सुविधा हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ. विशाल करवंदे यांनी सोमवारी उपचार सुरू असतांना तपासून मृत घोषीत केले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार आवारे करीत आहेत.
दुसरी घटना ड्रीमसीटी भागात घडली. या अपघातात राज जयवंत इगळे (२१ रा. समतानगर,आगर टाकळी) या युवकाचा मृत्यू झाला. राज इंगळे रविवारी (दि.२९) रात्री दुचाकीवर समतानगरकडून बोधलेनगरच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. ड्रीमसीटी समोर भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने राज इंगळे गंभीर जखमी झाला होता. त्यास भाऊ सुरज इंगळे याने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ. विनयकुमार यांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.