नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– औद्योगीक वसाहतीतील वेगवेगळया भागात दुचाकी घसरल्याने दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. त्यात एका १९ वर्षीय तरूणीसह कामगाराचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड व सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाथर्डी शिवारातील दामोदरनगर भागात राहणारी आकांक्षा काकमल सिंग (१९ रा. दुर्गा मंदिराजवळ,दामोदरनगर) ही युवती गेल्या शुक्रवारी (दि.२) सायंकाळी अंबडगावातून पाथर्डी फाट्याच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. अंबड गावाजवळ भरधाव दुचाकी घसरल्याने ती गंभीर जखमी झाली होती. या अपघातात तिच्या पोटास दुखापत झाल्याने तिला तात्काळ अशोका हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. गुरूवारी (दि.२२) उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी तिला तपासून मृत घोषीत केले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बनतोडे करीत आहेत.
दुसरा अपघात सातपूर औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात झाला. मयुर नरेंद्र पाटील (२० रा.गणराज सोसा.अशोकनगर) हा कारखाना कामगार गुरूवारी (दि.२२) रात्रपाळीची सेवा बजावून दुचाकीवर आपल्या घराकडे जात असतांना हा अपघात झाला. अशोकनगर पोलीस चौकीसमोर भरधाव दुचाकी घसरल्याने पाटील गंभीर जखमी झाला होता. मित्र सागर बडगुजर यांनी त्यास तात्काळ नजीकच्या श्री साईनाथ हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार डिगे करीत आहेत.