नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये तीन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. त्यात आगरटाकळी येथील दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
आगरटाकळी येथील आयुष सोमनाथ तांदळे (१५ रा.शंकर काठे मळा,गांधीनगर) हा मुलगा सोमवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास आपल्या दुचाकीवर टाकळीकडून मिर्ची हॉटेलच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. इच्छामणी सर्व्हीस स्टेशन भागात भरधाव छोटा हत्ती टेम्पोने दुचाकीस धडक दिल्याने तो रस्त्यावर पडला असता पाठमागून येणा-या आयशर वाहन त्याच्या अंगावरून गेले. या अपघातात आयुष गंभीर जखमी झाल्याने काका पांडूरंग तांदळे यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.
दुसरा अपघात याच भागातील गोदावरी लॉन्स परिसरात झाला. या अपघातात साहिल प्रमोद बाविस्कर (१५ रा. समतानगर आगरटाकळी) याचा मृत्यू झाला. साहिल बाविस्कर मंगळवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास जत्रा हॉटेलकडून टाकळीगावाच्या दिशने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत होता. गोदावरी लान्स परिसरातील टाकळी पुलावर भरधाव चारचाकीने दुचाकीस धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यास वडिल प्रमोद बाविस्कर यांनी तात्काळ आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता दुस-या दिवशी उपचार सुरू असतांना डॉ. राधीका भट्टमवार यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले.
तिसरा अपघात नाशिक पुणे रोडवरील म्हसोबा मंदिर परिसरात झाला. या अपघातात गणेश रघुनाथ मथ्थु (३० रा. इंदिरानगर, लहवित ता.जि.नाशिक) या दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला. गणेश मथ्थु हे बुधवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास नाशिक कडून नाशिकरोडच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. बिग बाजार मॉल समोर भरधाव मालट्रकने दुचाकीस धडक दिल्याने मथ्थू गंभीर जखमी झाले होते. कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. तिन्ही घटनांप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात वेगवेगळया मृत्यूच्या नोदी करण्यात आल्या आहेत.