नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रस्ता ओलांडत असतांना भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ४२ वर्षीय महिला ठार झाली. हा अपघात वडनेर पाथर्डी मार्गावर झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लताबाई सुभाष ताळीकोटे (रा.पिंपळगावरोड,पाथर्डीगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.
ताळीकोटे या रविवारी (दि.९) सकाळच्या सुमारास पाथर्डी फाटा परिसरातील फळविक्री दुकानावर जात होत्या. ज्ञानेश्वर नगर येथील रस्ता ओलांडत असतांना हा अपघात झाला. पाथर्डी फाट्याकडून वडनेरगेटच्या दिशेने भरधाव जाणा-या एमएच १५ डीआर ८८९४ या दुचाकीने साईटेक्स टाईल मार्केट समोर त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना नजीकच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले.
याबाबत मुलगा दिपक ताळीकोटे यांच्या फिर्यादीवरून समाधान विठोबा खैरनार (रा.कामटवाडा,अंबड) या दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.