नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहर परिसरात वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दुचाकीवर प्रवास करणा-या महिलेसह तीन पादचारींचा मृत्यू झाला. त्यात तरूणासह अनोळखी व एका ७३ वर्षीय वृध्दाचा समावेश आहे. याबाबत आडगाव, देवळाली कॅम्प पंचवटी व नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघात व मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
भगूर येथील माया लक्ष्मण रोकडे (रा.समतावाडी,भगूर) या गेल्या शुक्रवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास भगूर येथील पुलावरून आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. भरधाव दुचाकी स्पिडब्रेकरवर आदळल्याने रोकडे या तोल जावून पडल्या होत्या. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने मुलगा दिनेश रोकडे यांनी त्यांना तातडीने आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता मंगळवारी उपचार सुरू असतांना डॉ.प्रतिक बडोले यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार मिरजे करीत आहेत.
दुसरा अपघात अमृतधाम परिसरात झाला. वैभव विश्वनाथ जाधव (२१ रा.श्रीरामचंद्र सोसा. आयोध्यानगरी अमृतधाम) हा युवक मंगळवारी रात्रीच्या सुमारास मंडलिक मळयाकडून पायी अमृतधामच्या दिशेने जात अतांना हा अपघात झाला. वरदविनायक गणपती मंदिरासमोरील रोडवर भरधाव एमएच १५ इक्यू २८९४ दुचाकीने जाधव यास धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. वडिल विश्वनाथ जाधव यांनी त्यास तात्काळा नजीकच्या अपोलो रूग्णालयात दाखल केले असता मध्यरात्री उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत डॉ. प्रविण जाधव यांनी दिलेल्या खबरीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार कोरडे करीत आहेत.
तिसरा अपघात छत्रपती संभाजीनगर मार्गावरील नांदूरनाका भागात झाला. सुयर्भान यादव गुंजाळ (७३ रा.वृंदावननगर नांदुरनाका) यांचा या अपघातात मृत्यू झाला. गुंजाळ गेल्या शनिवारी (दि.३०) सकाळी साडे दहाच्या सुमारास नांदूरनाक्याकडून संजिवणी लॉन्सच्या दिशेने रस्त्याने पायी जात असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या पल्सरने एमएच १५ जेक्यू २६३९ त्यांना धडक देत पुढे उभ्या असलेल्या किया कारवर एमएच १५ एचजी ३८७९ जावून आदळली. या अपघाता मृत गुंजाळ व दुचाकीस्वार किरण माधव माळगावे (मुळ रा.चिमणपाडा ता.दिंडोरी हल्ली फुलेनगर पंचवटी) हा युवक जखमी झाला होता. तर दोन्ही वाहनांचेही या अपघातात मोठे नुकसान झाले होते. या अपघातात गुंजाळ यांचा मृत्यू झाला असून मुलगा दिपक गुंजाळ यानी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार देसाई करीत आहेत.
चौथी घटना शिंदे पळसे भागात घडला. पोलीस हवालदार संतोष पाटील यांनी दिलेल्या फियार्दीत म्हटले, की ६० वर्षे वयोगटातील अनोळखी इसम गेल्या ८ ऑक्टोबर रोजी शिंदे गाव टोलनाक्याजवळील आप्पा का ढाबा समोरून पायी जात होता. त्यावेळी त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली होती या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृध्दाचा गुरूवारी (दि.२८) मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कोरडे करीत आहे.