नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात अपघाताचे सत्र सुरू असून वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसरूळ व नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघात आणि मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश रमेश वाघ ( रा.चापडगाव ता.दिंडोरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. वाघ ३१ ऑक्टोबर रोजी मित्र संजय नामदेव चावरे (४० रा.चापडगाव ता.दिंडोरी) याच्यासमेवत पेठरोडवरील आशेवाडी बारी येथील म्हसोबा मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन घेवून दोघे मित्र रस्ता ओलांडत असतांना हा अपघात झाला. पेठरोडकडे भरधाव जाणा-या एमएच २६ के ८४८८ या ट्रॅ्क्टरने चावरे यास जोरदार धडक दिली. या अपघातात चावरे याच्या अंगावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी पसार झालेल्या ट्रॅक्टर चालकाविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार राजू जगताप करीत आहेत.
दुसरा अपघात विहीतगाव भागात झाला होता. शंकर लक्ष्मण हगवणे (५८ रा.सौभाग्यनगर,विहीतगाव ता.जि.नाशिक) हे गेल्या २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीने नाशिकरोडकडून विहीतगावच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. लॅमरोडवरील युनियन बँकेसमोर भरधाव हायवा ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. मुंबईनाका परिसरातील सीएनएस हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू असतांना सोमवारी (दि.११) डॉ.राहूल गावीत यांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असू अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.