नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरातील वेगवेगळया भागातून जाणा-या उड्डाणपूलावर झालेल्या अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वार ठार झाले. त्यातील एकास अज्ञात वाहनाने तर दुस-यास मालट्रकने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी अंबड आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संकेत बबन गाडेकर (२७ रा.निमोण ता.संगमनेर अ.नगर) हा युवक गेल्या २८ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास एमएच १७ बीजे ०९२५ या दुचाकीवर मुंबई आग्रा महामार्गावरून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. द्वारकाकडून पाथर्डी फाट्याच्या दिशेने तो प्रवास करीत असतांना स्प्लेंडर हॉल समोरील उड्डाणपूलावर दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात संकेत गाडेकर हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर गेली सहा महिने उपचार सुरू होते. सोमवारी (दि.१६) पहाटेच्या सुमारास सोपान हॉस्पिटलमध्ये त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याबाबत भाऊराव गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.
दुसरा अपघात नाशिकरोड येथील उड्डाणपूलावर झाला. या अपघातात अमित राजेंद्र मिश्रा (३० रा.हरिसंस्कृती खर्जुलमळा ) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मिश्रा बुधवारी (दि.१८) सकाळच्या सुमारास नाशिक पुणे मार्गावरील नाशिकरोड येथील रेल्वे ब्रिज उड्डाणपूलावरून दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. पाठीमागून भरधाव येणाºया एमएच १५ एफव्ही ९८९१ या मालट्रकने दुचाकीस (एमएच १५ जीएस २९२५) धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार मिश्रा यांचा मृत्यू झाला. याबाबत अनिल मिश्रा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात ट्रक चालक संतोष पोरजे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक अजित शिंदे करीत आहेत.