नाशिक : औरंगाबाद रोडवरील रूचिरा हॉटेल भागात भरधाव कारने दिलेल्या धडकेत ३४ वर्षीय महिला ठार झाली. शितल विजय देवकर (रा.महाराष्ट्र बँकेजवळ,श्रीरामनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. देवकर या रस्त्याच्या कडेला उभ्या राहून अॅटोरिक्षाची प्रतिक्षा करीत असतांना ही धडक कारने दिली. याप्रकरणी कारचालकाविरूध्द आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवकर यांचे औरंगाबाद रोडवरील रूचिरा हॉटेल भागात शिवम मार्ट नावाचे किराणा दुकान आहे. शनिवारी (दि.२५) रात्री त्या दुकान वाढवून घरी जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे राहून अॅटोरिक्षाची वाट बघत असतांना हा अपघात झाला. नाशिकच्या दिशेने भरधाव जाणा-या एमएच १५ एचजी ६०३४ या कारने त्याना जोरदार धडक दिली. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी मृत महिलेचा भाऊ वैभव देवकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारचालक सुशिलकुमार मोहनलाल पटेल (रा.हिरावाडी) याच्याविरूध्द अपघाताची नोंद करण्यात आली असून उपनिरीक्षक पाथरे तपास करीत आहेत.