नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या इलेक्ट्रीक पोलवर आदळल्याने झालेल्या अपघातात ४९ वर्षीय चालक ठार झाला. हा अपघात गंगापूररोडवरील श्री गुरूजी हॉस्पिटल भागात झाला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत दुचाकीस्वार पाटबंधारे विभागातील कर्मचारी असल्याचे कळते.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळकृष्ण शंकर शिंपी (४९ रा.स्वामी समर्थ केंद्राजवळ,श्रमिकनगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. शिंपी पाटबंधारे विभागात कार्यरत असून निवडणुक काळासाठी त्यांची वैजापूर (जि.छत्रपती संभाजीनगर) येथे नेमणुक असल्याचे कळते. गुरूवारी (दि.३१) मध्यरात्री हा अपघात झाला. शिंपी सेवा बजावून रात्रीच्या वेळी बसने शहरात दाखल झाले होते. बसस्थानक परिसरात पार्क केलेली अॅक्टीव्हा एमएच १५ एचडी २०११ दुचाकीवर ते घराकडे निघाले असता हा अपघात झाला. गंगापूररोडने रात्री दीड वाजेच्या सुमारास ते प्रवास करीत असतांना श्री गुरूजी हॉस्पिटल समोरील इलेक्ट्रीक पोलवर भरधाव दुचाकी आदळली.
हा अपघात चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने झाला. या घटनेत शिंपी गंभीर जखमी झाले होते. हा अपघात इतका भयंकर होता की आवाजाने गुरूजी हॉस्पिटल आवारातील रूग्णांच्या नातेवाईकांनी धाव घेतली. गुरूजी हॉस्पिटलमधील प्रथमोपचारानंतर पत्नी लता शिपी यांनी त्यांना जिल्हरूग्णालयात दाखल केले असता पहाटे उपचार सुरू असतांना डॉ. करण वर्मा यांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक हर्षल अहिरराव करीत आहेत.