नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर व जिल्ह्यात लाचखोरीला ऊत आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात आज मोठा मासा गळाला लागला आहे. गेल्या काही वर्षातील एसीबीची ही मोठी कारवाई आहे. नाशकातील तालुका सहायक निबंधकच तब्बल २० लाखाची लाच घेताना एसीबीच्या पथकाला रंगेहाथ सापडला आहे. विशेष म्हणजे, या लाचखोरीत तालुका निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपीकाचाही सहभाग होता. त्यामुळे सहायक निबंधकासह वरिष्ठ लिपिकाला एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, लाचखोर सहाय्यक निबंधकाचे नाव रणजित पाटील असे आहे. सावकारी कायद्यातर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी पाटील याने २० लाख रुपयांची लाच मागितली होती. या सर्व प्रकारात वरिष्ठ लिपीक प्रवीण अर्जुन वीरनारायण याचाही सहभाग होता. यासंदर्भात एसीबीकडे तक्रार आली. त्यानंतर एसीबीच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला.
एसीबीच्या पथकाने थोड्याच वेळापूर्वी सापळा रचला. या सापळ्यात लाचखोर निबंधक पाटील आणि लिपीक वीरनारायण हे अडकले आहेत. त्यांनी २० लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघांची आता कसून चौकशी सुरू आहे. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास बराच वेळ लागण्याची चिन्हे आहेत.
नाशिक शहरात खासगी सावकारीने उच्छाद मांडला आहे. सावकाराच्या जाचाला कंटाळून सातपूरच्या अशोक नगर परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांनी आपले जीवन संपवले आहे. त्यानंतर पोलिसांनी तब्बल २० सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तसेच सहकार विभागानेही सावकारांविरुद्ध मोहिम उघडली आहे. आणि आता या मोहिमेअंतर्गतच कारवाई न करण्यासाठी तब्बल २० लाख रुपयांची लाच घेताना तालुका सहाय्यक निबंधक व वरिष्ठ लिपीक जाळ्यात अडकले आहेत.
लाचखोरीच्या या मोठ्या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, लाच देणे आणि घेणे हा गुन्हा असून यासंदर्भात तक्रार करण्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधिक्षक वालावलकर यांनी केले आहे.
Nashik ACB Trap 20 Lakh Bribe Corruption Cooperative