नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महसूल सप्ताह सुरू असतानाच नाशिकचा लाचखोर तहसिलदार नरेशकुमार तुकाराम बहिरम हा तब्बल १५ लाखाची लाच घेतली होती. त्यामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे नाशिक दौऱ्यावर होते. आणि त्याच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात बहिरम अडकला आहे. त्यामुळे त्याची राज्यभरात चर्चा होत आहे. लाचखोर बहिरमला आज नाशिक न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला मंगळवारपर्यंत ८ ऑगस्ट पोलिस कोठडी देण्यात आली होती. आज मुदत संपल्यानंतर न्यायालयाने पुन्हा दोन दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. ही पोलिस कोठडी १० ऑगस्ट पर्यंत आहे.
बहिरम याच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एसीबीच्या पथकाने लाचखोर बहिरमच्या घराची झाडाझडती घेतली आहे. बहिरम हा फ्लॅट नंबर ६०४, बी विंग, मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर येथे राहतो. त्याचा हा फ्लॅट आलिशान आहे. याच घराची झाडाझडती घेतली असता एसीबीच्या पथकाला मोठे घबाड मिळाले आहे.. त्यामुळे आता एसीबीकडून बहिरम याच्या संपत्तीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. बहिरमने नक्की किती माया जमवली आहे याचा शोध एसीबीच्या पथकाकडून घेतला जाणार आहे.
महसूल विभागाची कारवाई
राज्याच्या महसूल विभागानेही याची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळेच बहिरमचे निलंबन करण्यात आले आहे. बहिरम विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला न्यायालयाने कोठडी ठोठावल्याने महसूल विभागाने त्याचे निलंबन केले आहे. दरम्यान, बहिरमकडे एक भूखंड असल्याचे एसीबीला आढळून आले आहे. हा भूखंड धुळे जिल्ह्यात आहे. त्याची किंमत अद्याप कळू शकलेली नाही.
सापडले एवढे घबाड
तब्बल १५ लाखाची लाच घेतांना रंगेहात सापडलेला नाशिकचा तहसिलदार नरेशकुमार तुकाराम बहिरम याच्या घरात ४० तोळे सोने सापडले आहे. या सोन्याची बाजारातील किंमत २४ लाख ४८ हजार रुपये एवढी आहे. तसेच, त्याच्या घरामध्ये ४ लाख ८० हजार रुपयांची रोकडही सापडली आहे. प्रथमदर्शनी मिळालेले हे घबाड आहे. आता त्याचे बँक खाते, बँक लॉकर, अन्य स्थावर मालमत्ता या सर्वांचीच झडती एसीबीकडून घेतली जाणार आहे. न्यायालयाने कोठडी सुनावताच एसीबीच्या पथकाकडून आणखी तपास केला जाणार आहे. एनसीबीने त्यांच्याकडे लाखो रुपयांचा भूखंड असल्याचेही सांगितले आहे.
असा अडकला जाळ्यात
राजुर बहुला येथे एका जमिनीमध्ये मुरुम उत्खनन केले जात आहे. यामुळे नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम १ कोटी २५ लाख ६ हजार २२० दंडाची नोटिस तहसील कार्यालयाने जागा मालकास दिली. या आदेशाविरुद्ध जमीन मालकाने उपविभागीय अधिकारी, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले. याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण पुनश्च फेरचौकशीसाठी नरेशकुमार बहिरम, तहसीलदार नाशिक यांच्याकडे पाठवण्यात आले. सदर मिळकती मधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर झाल्याचे जमीन मालकाने सांगितले. याबाबत पडताळणी करणे कामी लाचखोर बहिरम याने जमीन मालकाला त्याच्या मालकीच्या राजुर बहुला येथे स्थळ निरीक्षण वेळी बोलावले. परंतु जमीन मालक वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी एका व्यक्तीला तेथे पाठवले. ती व्यक्ती लाचखोर बहिरम यास स्थळ निरीक्षण वेळी भेटली. त्यावेळी लाचखोर बहिरमने १५ लाख रुपयांची लाच मागितली. सदरील लाच मागणी केल्याचे पडताळणी पंचनामा वेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले. व मागणी केलेली लाचेची रक्कम लाच म्हणून स्वीकारली.
Nashik ACB Tehsildar naresh bahiram police custody
bribe corruption trap revenue suspension