नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या महावितरण कार्यालयाला लाचखोरीने पोखरले असल्याचे स्पष्ट होत आहे. काही दिवसांपूर्वीच एका अधिकाऱ्याला लाच घेताना पकडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात आज एकाचवेळी तिघे जण सापडले आहेत. त्यामुळे महावितरणच्या वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. तसेच, गेल्या काही दिवसातला एसीबीचा हा यशस्वी नववा सापळा आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, सरकारी योजनेमार्फत एका जणाला दोन विद्युत रोहित्र हलविण्याबाबतचे काम मिळाले होते. या कामाच्या अंदाजपत्रकांची तपासणी करणे, त्यासाठी मदत आणि हे प्रकरण मंजुरीसाठी पुढे पाठविण्यासाठी श्रीमती दीप्ती धीरेन वंजारी (वय 37 वर्ष, उपकार्यकारी अभियंता, वर्ग-2, म.रा.वि.वि.नाशिक शहर मंडळ) यांनी २ हजार रुपयांची लाच मागितली. तर, श्री सचिन मुरलीधर बोरसे, (वय 43 वर्ष, निम्नस्तरीय लिपिक, वर्ग- 03, म. रा. वि. वि.,नाशिक शहर मंडळ) यानेही अंदाजपत्रकाचे ऑडिट कामी मदत करण्यासाठी एका अंदाज पत्रकाचे १ हजार रुपये असे दोन अंदाज पत्रकांचे २ हजार रुपयांची लाच मागितली. त्यापाठोपाठ श्री राजेंद्र साहेबराव पाटील (वय 41 वर्ष, सहायक अभियंता, वर्ग-2, म.रा. वि. वि.,नाशिक शहर विभाग-01) याने एस एस इन्फ्रोकॉम, नाशिक यांच्याकडील विद्युत रोहित्र बसवण्याचे मिळालेल्या कामाचे अंदाजपत्रक मंजुरीत मदत करण्याच्या मोबदल्यात अडीच हजार रुपयांची मागणी केली.
म्हणजेच एकाच व्यक्तीकडे तिघांनी लाच मागितली. अखेर यासंदर्भात एसीबीकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. आणि एसीबीच्या सापळ्यात हे तिघे सापडले आहेत. लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे. त्यामुळे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ एसीबीच्या 0253 2578230 किंवा टोल फ्रि क्रं. 1064 वर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.
Nashik ACB Raid Mahavitaran MSEDCL Bribe Corruption
Crime