नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाडेतत्वावरील इमारतीच्या देयकाची पडताळणी करून ते मंजूरीसाठी पाठविण्याच्या मोबदल्यात अटक करण्यात आलेल्या आदिवासी विकास विभागाच्या लेखापालाच्या घरात मोठे घबाड एसीबीच्या हाती लागले आहे. घरझडतीत प्रथमदर्शनी ७६ हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून न्यायालयाने संशयितास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
भास्कर रानोजी जेजुरकर( रा. भवानी पार्क भगवतीनगर, हिरावाडी) असे न्यायालयाने कोठडी सुनावलेल्या संशयिताचे नाव आहे. आंबोली ता. त्र्यंबकेश्वर येथील तक्रारदाराची इमारत आदिवासी विकास विभागास आश्रमशाळेसाठी भाडे तत्वावर दिली आहे. या इमारतीचे एप्रिल ते जून २०२३ या कालावधीचे एकूण ४,५९, २५८ रुपये थकीत घरभाड्याचे देयक पडताळणी करून नाशिकच्या प्रकल्प अधिकाºयांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार होते. या कामासाठी तक्रारदाराने लेखाधिकारी भास्कर जेजूरकर यांची भेट घेतली असता संशयिताने १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी याबाबत संपर्क साधला. तक्रारीची पथकाने पडताळणी करून सापळा रचला. जेजूरकरने १० हजार रुपयांची मागणी करुन अमृततूल्य चहा दुकानासमोर स्वीकारतांना जेजूरकर यास पथकाने ताब्यात घेतले. मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जेजूरकरच्या घरझडतीत रोकडसह दागिणे असा सुमारे अठरा लाखाचा मुद्देमाल मिळाला आहे. दरम्यान जेजूरकर याच्या ज्ञात अज्ञात संपतीच्या शोधार्थ सरकार पक्षाच्या वतीने पोलिस कोठडीची मागणी लावून धरली असता न्यायालयाने त्यास तीन दिवसांची कोठडी सुनावली.
Nashik ACB Raid Bribe Corruption Bhaskar Jejurkar Home Wealth
Trap Crime