नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तब्बल ४० लाख रुपयांच्या लाच प्रकरणी दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी (प्रांत) डॉ. निलेश अपार यांचा आजचा आषाढी एकादशीचा दिवस चौकशीतच पार पडला. डॉ. अपार हे स्वतःच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कार्यालयात हजर झाले. एसीबीच्या पथकाने त्यांची सविस्तरपणे चौकशी केली आहे.
दिंडोरी तालुक्यातील एका उद्यागोने अकृषक परवाना न घेता बांधकाम केल्याबद्दल डॉ. अपार यांनी त्या उद्योगाला नोटीस बजावली होती. तसेच, कंपनीचे उत्पादन बंद करण्याचे आदेश तोंडी दिले होते. याप्रकरणी डॉ. अपार यांनी ५० लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र, तडजोडी अंती ही रक्कम ४० लाख रुपये करण्यात आली. आणि याच प्रकरणी डॉ. अपार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लाच प्रकरणाची सध्या राज्यभरातच चर्चा होत आहे. हा सर्व प्रकार बुधवार, २८ जून रोजी घडला. त्यानंतर आज, २९ जून रोजी आषाढी एकादशी आणि बकरी ईदची सरकारी सुटी होती. मात्र, डॉ. अपार हे एसीबीच्या कार्यालयात स्वतःहून चौकशीसाठी हजर झाले. डॉ. अपार यांचे निवासस्थान नाही. ते दिंडोरीच्या सरकारी घरातच वास्तव्यास आहेत. एसीबीने त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. डॉ. अपार यांच्याकडे ५० ते ६० हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे.
तांत्रिक अडचण
डॉ. अपार हे प्रत्यक्ष ४० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडलेले नाहीत. केवळ लाचेची मागणी करण्याचाच प्रकार घडला आहे. फोनवर प्रत्यक्ष झालेला संवाद हाच एसीबीकडे पुरावा आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी, या प्रकरणात डॉ. अपार यांना प्रत्यक्ष अटक किंवा त्यांची कोठडीत रवानगी होणे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.