नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मकर संक्रांतीच्या सणाच्या तोंडावर शहरातील औद्योगिक वसाहतीतून एक मोठी खुषखबर आहे. नाशकातील मोठ्या औद्योगिक कंपन्यांपैकी एक असलेल्या एबीबी या कंपनीने कामगारांसोबत ऐतिहासिक करार केला आहे. याअंतर्गत कामगारांना भरघोस पगारवाढ मिळणार आहे. एबीबी कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात हा करार झाला असून आता कामगारांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे.
सातपूर औद्योगिक वसाहतीतील बहुराष्ट्रीय कंपनी एबीबी इंडिया लिमिटेडने आपल्या कामगारांना भरघोस पगारवाढ देऊन मकर संक्रांतीची गोड भेट दिली आहे. एबीबी व्यवस्थापन आणि स्वर्गीय दत्ता सामंत प्रणित असोसिएशन ऑफ इंजिनीअरिंग वर्कर्स यांच्यात करार संपन्न झाला आहे. हा करार साडेचार वर्षांसाठी (१ जानेवारी २०२३ ते ३० जून २०२७) या कालावधीसाठी आहे. या कराराद्वारे कामगारांना मासिक वेतनात तब्बल रू.२३,७००/- एवढी पगारवाढ मिळणार आहे. त्याशिवाय अधिक प्रोडक्शन इन्सेन्टिव्ह रु. ४००/- सुद्धा मिळणार आहे. म्हणजेच, कामगारांना महिन्याकाठी रु. २४,१००/- ची थेट पगारवाढ मिळणार आहे. या व्यतिरिक्त प्रोव्हिडंड फंड व ग्रॅच्युटीचे लाभ देखील मिळणार आहेत. त्याशिवाय कंपनीकडून कामगारांना दिवाळी ऍडव्हान्स, गृह कर्ज, शूज, जॅकेट, शिफ्ट अलाउन्स इत्यादी सुविधा देखील मिळणार आहेत.
प्रस्थापित कराराचा ४१ दिवस कालावधी शिल्लक असताना देखील सदर कालावधीची वेतनवाढ आगाऊ स्वरूपात देऊन व्यवस्थापनाने कामगारांना सुखद धक्का दिला आहे. कामगारांनी सुरक्षा, नैतिकता, अनुशासन व कार्यक्षमता यांचा अंगीकार करून कंपनीच्या प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा उचलल्याने सदरची पगारवाढ करण्यात आल्याचे कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री गणेश कोठावदे यांनी नमूद केले.
सदर करार यशस्वी आणि खेळीमेळीच्या वातावरणात सर्व संमतीने घडवून आणण्यात युनियनच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष श्री भूषण सामंत , सरचिटणीस श्री संजय कोळवणकर, उपाध्यक्ष श्री वर्गीस चाको, स्थानिक पदाधिकारी श्री मनोज पवार ,श्री देवेंद्र पाटील ,श्री मेघराज अहिरे, श्री हंसराज पवार,श्री तुषार निकम , तर व्यवस्थापना च्या वतीने वरिष्ठ उपाध्यक्ष श्री गणेश कोठावदे ,HR मॅनेजर श्री दयानंद कुलकर्णी , श्री राहुल बढे ,श्री मनोज वाघ ,श्री रोहन घोगरे आदींनी मोलाचा सहभाग दिला. करार स्वाक्षरी होताच सर्व कामगार सहकाऱ्यांनी फटाके वाजवून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला. कार्यक्रमाचे नियोजन श्री अतुल जाधव, महेश धार्मिक व मनोज हाडोळे आदींनी केले व सूत्रसंचालन श्री किरण घोलप आणि रोहन सगर यांनी केले. मेघराज अहिरे यांनी आभार मानले.
Nashik ABB Worker Union MOU Agreement Increment Salary Hike
Industry