नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील सातपूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या ABB कंपनीमध्ये आगळे वेगळे स्नेहसंमेलन संपन्न झाले. कंपनीच्या स्थापनेपासून आतापर्यंत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीत सपत्नीक आमंत्रित करण्यात आले. अत्यंत वेगळ्या स्वरुपाचा हा सोहळ्या सध्या औद्योगिक क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.
एबीबी नाशिक व्यवस्थापनाने १९७८-२०२३ या ४५वर्षात दीर्घ सेवा केलेल्या निवृत्त कर्मचार्यांना सपत्नीक आमंत्रित करत आगळावेगळा सोहळा पार पडला. कार्पोरेट जगात जगत असतांना शेवटच्या दिवशी हातामध्ये हिशोबाचा चेक आणि पुष्पगुच्छ देवून सेवानिवृत्त केल्यावर त्या कर्मचार्याला पुन्हा कधीही बोलावले जात नाही, याला अपवाद म्हणजे नुकताच एबीबी नाशिक प्लांट १ येथे पार पडलेल्या सेवानिवृत्त कर्मचार्यांचे स्नेहसंमेलन.ज्यांनी आपल्या उमेदीच्या काळात येथे प्रामाणिक कष्ट केले आहेत आणि आज जे सेवानिवृत्त आहेत त्यांनी आजपर्यंतची प्रगती अनुभवावी तसेच पुनःश्च सर्वांनी एकदा या वास्तूत भेटावे यासाठी व्यवस्थापनाने एका सुंदर स्नेहसंमेलनाचे नियोजन केले.
सुमारे 150 हुन अधिक सेवानिवृत्त कर्मचार्यांनी सकाळी 9 पासूनच कंपनीत दाखल व्हायला सुरुवात केली.मग ट्रॉली वरून चहा घेत घेत एकमेकांशी हस्तआंदोलन आणि गळाभेटी सुरुवात झाल्या.30 40 वर्षांनी सर्वजण एकमेकांना भेटत होते.गप्पा आणि हास्यविनोदाने वातावरण भारून गेले होते.चहापानाचा आस्वाद घेत गप्पा रंगल्या.विशेष म्हणजे या संमेलनाला दिल्ली, बेंगलोर, बरोडा, मुंबई, पुणे आदी ठिकाणहून वय वर्ष 72 ते 89 मधील वयाच्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी आपली उपस्थिती लावली.प्रत्येकाला आपल्या कर्मभूमी प्रति असलेली ओढ आणि अनेक वर्षानंतर भेटणारे मित्र मैत्रिणी याविषयीची उत्सुकता सर्वांच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन संदर्भात HR Head श्री दयानंद कुलकर्णी यांनी पार्श्वभूमी विशद केली.यानंतर कार्यक्रमाची संकल्पना सांगताना ABB चे प्रेसिडेंट श्री गणेश कोठावदे यांनी उपस्थितांना स्थापनेवेळी लावलेल्या ASEA या छोट्याशा रोपाचे ABB नावाच्या विशाल वृक्षात परिवर्तन होण्याचा रोमहर्षक प्रवास उलगडून दाखविला व या प्रवासात योगदान देणाऱ्या सर्व माजी सहकाऱ्यांचे आभार मानले व पुढील प्रगतीसाठी सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वाद ABB ला लाभावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या नियाजनात जुन्या सहकाऱ्यांचे पत्ते, फोन नंबर मिळवून देऊन त्यांना संपर्क करण्याचे महत्वपूर्ण काम ज्यांनी केले असे श्री प्रविण मानकर,ABB नाशिकचे पहिले HR Head श्री विश्वास शेवडे, कंपनीचे माजी जनरल मॅनेजर श्री माधव दिग्रसकर, श्री सी एम ठाकूर, श्री गिरीश बाग आदींनी या कार्यक्रमाबद्दलच्या आपल्या भावना व जुन्या आठवणी सद्गतीत होऊन मांडल्या व कंपनीने आयोजित केलेल्या या आगळ्यावेगळ्या संमेलनात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल व्यवस्थापनाचे आभार मानले.कंपनीचे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट हेड श्री मिलिंद तांबट यांनी उपस्थितांचे आभार मानले व मागील काळात दिवंगत झालेल्या सहकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून मुख्य कार्यकामाची सांगता झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नितीन सहस्त्रबुद्धे यांनी केले.
बऱ्याच वर्षानंतर पुन्हा कंपनीत यायला मिळाल्यामुळे फोटो सेशन, सेल्फी विथ ABB लोगो जोरात होते.उपस्थितांपैकी प्रत्येकाने प्लांट व्हिजिट करून आपली जुनी जागा सापडते का ते शोधण्याचा प्रयत्न केला व मागिल कालावधीत कंपनीत झालेल्या अनेक बदलांचा मागोवा घेतला.नंतर सुग्रास भोजनाचा आस्वाद घेत या कार्यक्रमाच्या छानश्या स्मृती मनात ठेऊन घराकडे प्रयाण केले.उद्योगिक वसाहतीत प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम केल्याबद्दल ABB चर्चेचा विषय झाल्याचे दिसून आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सुनिल रत्नपारखी, श्री अशोक कुलकर्णी, श्री लक्ष्मीकांत खैरनार, श्री वसंत सोनवणे,अमित सैनी आदींनी विशेष प्रयत्न केले. “आमच्या प्रगतीत वर्तमानातल्या कर्मचाऱ्यांबरोबरच भूतकाळातील कर्मचाऱ्यांचेही मोठे योगदान आहे म्हणूनच आमच्या या यशात आम्ही त्यांनाही सहभागी करून घेत आहोत. खरंतर एखाद्या कंपनीसाठी नोकरीं सोडून जाणं किंवा रिटायर होणं हे काही नविन नाही पण व्यावसायिक ठिकाणीही नात्यातला ओलावा जपणे हेच या कार्यक्रमा मागचे उद्दिष्ट होते. पुढील प्रगतीसाठी तुम्हा सर्वांच्या सदिच्छा आणि आशिर्वाद लाभो अशी आशा करतो “अशी प्रतिक्रीया कंपनीचे उपाध्यक्ष गणेश कोठावदे यांनी व्यक्त केली आहे.
Nashik ABB Company Retired Employee Family Get Together