नाशिक- मानवातील दिव्यत्वाच्या उत्थानासाठी केलेले प्रयत्न हीच पूजा मानण्याचा स्वामी विवेकानंदांनी दिलेला वसा घेऊन नाशिक आणि त्र्यंबक परिसरातील वंचित व आदिवासींसाठी गेल्या १७ वर्षांपासून कार्य करणाऱ्या श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानच्या स्वामी श्रीकंठानंद यांना ‘नाशिक सिटीझन्स फोरम’ने मे महिन्याचा ‘आऊटस्टँडींग सिटीझन ऑफ नाशिक’ ही पुरस्कार जाहीर केला आहे.
नाशिकच्या उन्नती आणि उत्थानासाठी विविध क्षेत्रांत अविरतपणे कार्यरत असणाऱ्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींच्या कामाला दाद देण्यासाठी ‘नाशिक सिटीझन फोरम’तर्फे दर महिन्याला ‘आउटस्टँडींग सिटीझन ऑफ नाशिक’ हा पुरस्कार घोषित केला जातो. नाशिकजवळील पेगलवाडी स्थित श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान-विवेकानंद ध्यान-योग केंद्राचे अध्यक्ष म्हणून श्रीकंठानंद कार्यरत आहेत. आरोग्य, शिक्षण व कौशल्यविकास आणि पर्यावरण व उपजिवीका या विषयांवर श्रीकंठानंद काम करतात. ग्रामिण आणि शहरी, गरिब आणि श्रीमंत, सुस्थित आणि वंचित यांच्यातील सामाजिक दरी मिटविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. नाशिक परिसरातील वंचित आदिवासी समाजातील अनेक विद्यार्थी आणि कुटुंबांचे पालकत्व त्यांनी स्विकारले आहे. श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानच्या माध्यमातून विवेकानंद इन्स्टिट्यूटमार्फत मिशन स्किल इंडीयाअंतर्गत अकरा हजारांपेक्षा अधिक जणांना श्रीकंठानंदांच्या नेतृत्त्वाखाली कौशल्य विकास प्रशिक्षण दिले गेले असून हा उपक्रम जोमाने सुरू आहे. केवळ आदिवासीच नव्हे तर शहरातील वंचितांसाठीही कौशल्य विकासाचा हा उपक्रम श्रीकंठानंदांनी हाती घेतला आहे.
संस्थानच्या माध्यमातून वंचितांच्या उत्थानासाठी श्रीकंठानंद विविध प्रकल्पांची मालिकाच राबवत असतात. त्यात गावांना स्वयंपूर्ण करण्यासाठीच्या समर्थ ग्राम प्रकल्पातून ३८८७० लोकांना, कुपोषण दूर करण्यासाठी मल्टीविटामिन गोळ्या पुरविणाऱ्या विवेकानंद पोषण प्रकल्पातून १४७०० लोकांना, विवेकांनंद फिरत्या आरोग्य केंद्रांद्वारे १६६८९ लोकांना, कुंभमेळ्यातील महाआरोग्य शिबिर व विवेकानंद आरोग्य केंद्रामार्फत ३५ हजार लोकांना त्यांनी सेवा पुरविली आहे. याशिवाय स्वामी विवेकानंदांच्या नावाने श्रीकंठानंदांनी उभारलेले एक मल्टीस्पेशॅलिटी धर्मदाय रुग्णालयही त्यांनी दुर्गम भागातील आदिवासींसाठी सेवारत आहे. शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती आणि कृषी मार्गदर्शनाचे कामही ते गोशाळेच्या माध्यमातून करत असतात. त्याचप्रमाणे त्यांनी विवेकांनंद वृक्षारोपण प्रकल्पाअंतर्गत एक लाख झाडे लावली आहेत.
स्वामी विवेकांनंदांनी गीता आणि वेदांसारख्या भारतीय पुराणांचा आधुनिक काळाच्या संदर्भाने मांडलेला अन्वयार्थ आदर्शवत मानून श्रीकंठानंद व्यक्तीमत्व आणि राष्ट्र यांच्या जडणघडणीचा संदेश सातत्याने भारतभर पोहोचवत असतात. भारतीय संस्कृती, विज्ञान आणि अध्यात्म, जीवन व्यवस्थापन, व्यक्तीमत्व व कौशल्य विकास, गीता आणि वेद आदी विषयांवर व्याख्याने देत असतात. नाशिकमधील विविध नामांकित संस्थाबरोबरच केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, पुणे विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ, भारत विकास परिषद अशा राष्ट्रीय पातळीवरील संस्थाही त्यांना व्याख्यानासाठी पाचारण करत असतात. युनायटेड नेशन्स व इंडियन कॉन्फेडरेशन्स ऑफ एनजीओज यांच्या विद्यमाने देणात येणाऱ्या कर्मवीर पुरस्काराने २०१६ व २०१९ साली गौरविण्यात आले आहे.
रामकृष्ण मिशनचे मुख्यालय असलेल्या बेलूर मठापासून श्रीकंठानंदानी त्यांच्या संन्यस्त जीवनाचा प्रारंभ केला. त्यांनी कर्नाटक, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश आदी राज्यांतील रामकृष्ण मिशनच्या शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी तयार केलेले अनेक विद्यार्थी आयआयटी, आयआयएम, एम्स अशा नामांकित संस्थांमध्ये आणि अमेरिका, कॅनडा, युनायटेड किंगडम अशा विविध देशांत उच्चशिक्षणासाठी पोहोचले आहेत.