नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूर रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पोलिस चौकीत मद्यपार्टी करणाऱ्या चौघा पोलिसांवर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. चौघा पोलिसांना पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी निलंबित केले आहे. अशा प्रकारांमुळे पोलिस दलाचे नाव खराब होत आहे, तसेच चौकीतच अवैध प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत, असा सज्जड दमही आयुक्तांनी दिल्याचे समजते.
मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बाळासाहेब शिंदे हे डी के नगर पोलिस चौकीमध्ये गेले. मात्र, तेथे गेले असता त्यांना भलताच प्रकार दिसला. चौकीतील पोलिस हे ओली पार्टी करीत होते. टेबलावर मद्याच्या बाटल्या आणि अन्य सामान त्यांनी पाहिले. हा भांडाफोड होऊ नये म्हणून शिंदे यांना चौकीत बसविण्यात आले. तसेच, त्यांना मारहाणही करण्यात आली. ही बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली. त्याचवेळी एक मद्यपी पोलिस तेथून पळून जात होता. मात्र, स्थानिक नागरिकांनी पाठलाग करुन त्याला पकडले. हा सर्वप्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे. यासंदर्भात काही जणांनी सहायक पोलिस आयुक्त दिपाली खन्ना यांनाही कळविण्यात आला. त्यांनी तातडीने पोलिस चौकी गाठली. तसेच, अन्य वरिष्ठ अधिकारीही तेथे हजर झाले. याप्रकरणी शिंदे यांनी तक्रार दिली. त्यानंतर आयुक्तांनी चौघांना निलंबित केले आहे.