नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरातून एकाच दिवशी तब्बल चार बालिका बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी या बालिकांच्या पालकांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहर परिसरातून बालिका आणि युवती बेपत्ता होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामागे विविध कारणे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढल्याचे दिसून येत आहे.
पंचवटीतील हिरावाडी परिसरात राहणारी मुलगी बाथरुमला जाऊन येते असे सांगून घराबाहेर पडली. त्यानंतर ती घरी न परतल्याने पंचवटी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परिविक्षाधीन उपनिरीक्षक पटारे तपास करत आहेत.
दिंडोरी रोडवरील शिवाजीनगर परिसरात रहाणारी मुलगी घरी एकटी होती. पालक परतल्यावर ती घरात नसल्याने तसेच त्यानंतरही घरी न परतल्याने म्हसरुळ पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला. उपनिरीक्षक चतूर तपास करत आहेत.
भाभानगरमधील गायकवाड हॉलजवळ रहाणारी मुलगी व वडील घरात झोपले होते. सकाळी वडील उठल्यानंतर मुलगी घरात नसल्याचे लक्षात आले. त्यानंतरही ती घरी न परतल्याने अखेर मुंबई नाका पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला. सहायक निरीक्षक गेंगजे तपास करत आहेत.
नाशिकरोडमधील पळसे येथील एसटी कॉलनीतील मुलगी दुकानातून चिप्स घेऊन येते म्हणून घराबाहेर पडली. त्यानंतर ती घरी न परतल्याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला. हवालदार उजागरे तपास करत आहेत.