इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अतिशय खडतर आणि कसोट्या पाहणी दुबई आयर्नमॅन ही स्पर्धा नाशिकच्या तीन जणांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. त्यात भगर मील उद्योजक आणि आयर्नमॅन महेंद्र छोरिया, कृतुजा डेरे आणि आयर्नमॅन प्रशांत डाबरी यांचा समावेश आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकचे नाव सातासमुद्रापार नावाजले आहे.
जगभरात ज्या मोजक्या आयर्नमॅन स्पर्धा होतात त्यात दुबई येथील स्पर्धेचाही समावेश आहे. ही स्पर्धा एकूण ११३ किलोमीटरची असते. त्यात १.९ किलोमीटरचे स्विमींग, ९० किलोमीटरचे सायकलिंग आणि २१ किलोमीटर रनिंगचा समावेश असतो. हे तिन्ही टप्पे एकामागोमाग सलग पूर्ण करायचे असतात. या स्पर्धेत शारीरिक पातळीवर अनेक कसोट्या उत्तीर्ण करावे लागतात. नाशिकच्या तिन्ही खेळाडूंनी ही स्पर्धा पूर्ण करुन मोठा विक्रम केला आहे. महेंद्र छोरिया यांनी ६ तास ५५ मिनिटे, प्रशांत डाबरी यांनी ७ तास २६ मिनिटे आणि कृतुजा डेरे हिने ७ तास ३८ मिनिटे या कालावधीत ही स्पर्धा पूर्ण केली आहे. जगभरातून तब्बल अडीच हजार स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. मात्र, अत्यंत मोजक्या स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण करुन आयर्नमॅनचा किताब पटकावला आहे. महेंद्र छोरिया यांनी यापूर्वी दोन आयर्नमॅन स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यामुळे ते आता तिसऱ्यांदा आयर्नमॅन झाले आहेत. प्रशांत डाबरी यांनीही आयर्नमॅनचा किताब पुन्हा जिंकला आहे. कृतुजा पहिल्यांदाच आयर्नमॅन झाली आहे. या तिघांच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नाशिकमधील मनसेच्या माजी नगरसेविका सुजाता डेरे यांची कृतुजा ही कन्या आहे.