चक्रधर स्वामींचे समाज प्रबोधन, ज्ञान प्रबोधनाचे
कार्य आजही सर्वांना प्रेरणादायक – आचार्य श्रीवर्धनस्थ महंत श्री बिडकर बाबा शास्त्रीयांचे प्रतिपादन...
नाशिक : सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी समाज प्रबोधन, ज्ञान प्रबोधन करीत भक्तिमार्गाचे कार्य केले. विशेष म्हणजे धर्म पंथाचे हे कार्य स्वामींनी त्या काळात प्रचलित असलेल्या संस्कृत भाषेतून न सांगता मराठी भाषेतून सांगितले. इतकेच नव्हे तर धार्मिक कार्याचा अधिकार हा केवळ उच्चवर्णीयांना नसून समाजातील सर्वच स्त्री पुरुषांना आणि सर्वसामान्य जनतेला आहे, असा संदेश दिला, असे प्रतिपादन महानुभाव पंथाचे उपाध्य कुल आचार्य श्रीवर्धनस्थ महंत श्री बिडकर बाबा शास्त्री ( रणाईचे ता. अमळनेर ) यांनी केले. चांदोरी (ता. निफाड ) येथील श्री चक्रधर स्वामी शताब्दी महोत्सव आणि जयंती सोहळ्याप्रसंगी धर्मसभेत आचार्य महंत शास्त्रीजी बोलत होते.
निफाड तालुक्यातील चांदोरी येथे बुधवार, दि. ८ रोजी जिल्हास्तरीय श्रीचक्रधर स्वामी अष्टंशताब्दी महोत्सव व जयंती सोहळा मोठ्या उत्साहात आणि शासनाच्या कोरोनानियमावलीचे पालन करीत संपन्न झाला. यावेळी पुढे बोलताना आचार्य महंत बिडकर बाबाजी म्हणाले की, श्री चक्रधर स्वामींनी त्या काळातील प्रस्थापित धर्म व्यवस्थेची कर्मकांडाची चौकट मोडून महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानाचा पाया रचला. श्री स्वामींनी त्या काळात सर्व महाराष्ट्रभर परिभ्रमण करून स्त्री – पुरुष समानता, अस्पृश्यता निवारण, अहिंसेचा संदेश, सर्व व्यसनांपासून दूर राहणे, कर्मकांडा पासून समाजाची मुक्तता, तसेच वर्णभेदावर देखील स्वामींनी प्रहार केले. त्यानंतरच्या आचार्यांनी स्वामींचे हे मोलाचे कार्य सर्व समाजात पोहोचविले. आजही स्वामींचे हे कार्य सर्व समाजासाठी प्रेरणादायक आहे. तसेच गेल्या सातशे वर्षांपासून महाराष्ट्रात पंथाचे कार्य निरंतर सुरू आहे, असेही आचार्य महंत बिडकर बाबाजी यांनी सांगितले.
या प्रसंगी महंत न्यांयव्यास बाबा (मकरधोकडा जि. नागपूर ) यांनी महानुभाव पंथाचे कार्य तसेच श्री चक्रधर स्वामींच्या जीवन कार्याचा सखोल परिचय करून दिला. त्याचप्रमाणे महानुभावची काशी असलेल्या श्रीक्षेत्र रूद्धपुर ( जि. अमरावती ) येथे मराठी भाषा तत्त्वज्ञान अध्ययन केंद्राची स्थापना होणार असल्याचे माहिती दिली. याप्रसंगी महंत श्री सुकेणेकर बाबा शास्त्री यांनी या महोत्सवाबद्दल माहिती दिली. याप्रसंगी महंत अंकुळनेरकर बाबा, महंत संतोष मुनी शास्त्री, निलेश दादा बिडकर आदींनी देखील विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांनी केले.
अखिल भारतीय महानुभाव परीषद, नाशिक जिल्हा महानुभाव परीषद व चांदोरी ग्रामस्थ व सदभक्त परीवार यांच्या वतीने या सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. धर्मसभेच्या प्रारंभी सकाळी देवास मंगलस्नान, भगवद्गीता पठान, पंथ ध्वजाचे पूजन व मानवंदना, सभामंडपाचे उद्घाटन देवास वंदन, संत महंतांचा सन्मान, आरती, विडा अवसर, देव पूजा, उपहार सोहळा आदि कार्यक्रम संपन्न झाले.
दरम्यान, दोन दिवसीय सोहळयात भजन, कीर्तन, वक्तृत्व स्पर्धा आदी कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमास महंत अर्जुनराज सुकेनेकरबाबा, महंत बाळकृष्णराज सुकेनेकर , महंत गोपीराजशास्ञी सुकेणेकर यांच्यासह जिल्ह्यातील संत व महंत , चांदोरी येथील अनुयायी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी कोरोना नियमाचे पालन करीत कार्यक्रमात सहभाग घेतला.