नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना विषाणू आणि त्यामुळे लागलेल्या लॉकडाऊनचा मोठा परिणाम विविध क्षेत्रांवर झाला आहे. शिक्षण क्षेत्रही त्यातून सुटलेले नाही. नाशिक शहरासह जिल्ह्यातील एकूण २० इंग्रजी माध्यमाच्या शाळा कोरोनामुळे बंद झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेशच होत नसल्याने शाळा प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे राज्याच्या शिक्षण विभागाने सांगितले आहे.
कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लागले. तसेच, अनेकांचा रोजगार गेला. विविध क्षेत्रांवर अतिशय विपरीत परिणाम झाला. शाळा बंद असल्याने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू होते. त्यातच विद्यार्थ्यांची संख्या अनेक शाळांमध्ये लक्षणीयरित्या रोडावली. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील तब्बल २० शाळांना कुलुप ठोकावे लागले आहे. खासगी इंग्रजी शाळांना सरकारकडून कुठलेही अनुदान मिळत नाही. आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडल्याने अखेर शाळा बंद करण्याचा निर्णय शाळा प्रमुखांनी घेतला आहे. तसे त्यांनी शिक्षण विभागाला कळविले आहे.
शाळांकडून आलेली माहिती आम्ही राज्य सरकारला सादर करीत आहोत. या शाळांना गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी मिळू शकलेले नाहीत. तसेच, यापुढेही शाळेचा परवाना कार्यरत ठेवण्याची शाळा प्रमुखांची तयारी नाही. त्यामुळे या शाळा आता पूर्णपणे बंद होत असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांकडून शुल्क मिळण्यातही असंख्य अडचणी येत असल्याने शाळांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. बंद झालेल्या शाळांमध्ये निफाड तालुक्यातील सहा, नाशिक शहरातील तीन, मालेगाव, कळवण, सुरगाणा, येवला आणि सिन्नरमधील प्रत्येकी दोन तर सटाण्यातील एक शाळा अशा एकूण २० शाळांचा समावेश आहे. या शाळा बंद झाल्याने तेथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा रोजगारही गेला आहे. तसेच, शाळेच्या परिसरावर अवलंबून असलेली अन्य अर्थव्यवस्थाही मोडकळली आहे.