नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने नाशिककरांनी मोठाच विश्वविक्रम केला आहे. एकाचवेळी तब्बल १९ नाशिककरांनी आयर्नमॅन ही स्पर्धा पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, जगात प्रथमच एखाद्या शहरातील एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी आयर्नमॅन होण्याचा बहुमान मिळविला आहे.
अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी स्पर्धा म्हणजे ‘आयर्न मॅन’ स्पर्धा (iron man competition). कझाकस्तानमध्ये ही स्पर्धा नुकतीच पार पडली. यात नाशिकच्या तब्बल १९ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. एक दोन नव्हे तर सर्वच्या सर्व स्पर्धकांनी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे नाशिकच्या तीन खेळाडूंनी आर्यनमॅन स्पर्धेवर कब्जा करण्याची हॅट्रिक केली आहे तर स्पर्धेतील एका पितापुत्रांनी एकाच स्पर्धेत भाग घेत ती यशस्वी पूर्ण करण्याचा रेकॉर्ड केला आहे. यामुळे नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहें…
दरम्यान, हा इव्हेंट अत्यंत चांगला आयोजित करण्यात आला होता. हवेचा वेग जास्त असल्यामुळे सायकलिंग करणे कठीण गेले. कझाकस्तानमध्ये स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय दूतावासाने आम्हाला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहणाचा मान दिला. त्यामुळे आम्ही भारतीय दूतावासाचे आभार व्यक्त करतो, अशा प्रतिक्रिया स्पर्धकांनी व्यक्त केल्या.
स्पर्धेचे स्वरुप
३.८ किमी स्विमिंग, १८० किमी सायकलिंग आणि ४२ किमी रनिंग असे या स्पर्धेचे स्वरूप होते.
हे बनले ‘आयर्नमॅन’
. डॉ. वैभव पाटील, डॉ. पंकज भदाणे,
. डॉ. दुष्यंत चोरडिया, डॉ. देविका पाटील,
. डॉ. अरुण गचाळे, किशोर काळे, माणिक निकम,
. अनिकेत झवर, प्रशांत डाबरी, अश्विनी देवरे,
. निलेश झवर, नीता नारंग, आविष्कार गचाळे
. निसर्ग भामरे, अरुण पालवे, महेंद्र छोरिया
. किशोर घुमरे, विजय काकड, धीरज पवार
पितापुत्रांची कमाल
नाशिकचे डॉ. अरुण गचाळे यांनी त्यांच्या १७ वर्षीय मुलगा आविष्कार सोबत या स्पर्धत सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे या दोघांनी स्पर्धेत साहसी कामगिरी करत स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. आयर्नमॅनसारखी अवघड स्पर्धा पूर्ण करणारे हे पहिलेच पितापुत्र ठरले, असे समजते.
या तिघांची हॅट्रिक
प्रशांत डबरी, महेंद्र छोरीया आणि अरुण गचाले यांनी सलग तीन वेळेस आयर्नमॅन स्पर्धेवर कब्जा केला आहे. या तिघांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आयर्नमॅनचा बहुमान मिळविल्यानंतर महेंद्र छोरिया म्हणाले की, आता हर देश में तिरंगा फडकावण्याचे आमचे लक्ष आहे. कझाकस्तानच्या स्पर्धेचे विशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत जगभरातून १८ ते २५ वयोगटात ७ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात दोन स्पर्धक नाशिकचे होते. नागरिक आता आयर्नमॅन स्पर्धेकडे आकर्षित होत आहेत. आता ऑलिम्पिकमध्येही ट्रायथलॉनचा समावेश करण्यात आला आहे. लवकरच नाशिकमध्ये आम्ही ट्रायथलॉन अकादमी सुरु करणार आहोत. जेणेकरून आयर्नमॅन स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंना चांगले प्रशिक्षण मिळेल. तसेच अल्ट्रामॅन स्पर्धा हे माझे पुढील लक्ष आहे. ही स्पर्धा जिंकण्यासाठी मी आता तयारीला लागलो आहे.
Nashik 19 Players Complete Ironman Competition World Record