नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : राज्य शासनाने जाहीर केलेल्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध योजना व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. शासनाने नव्याने लागू केलेल्या अनुकंपा नियुक्तीच्या सर्वसमोवशक सुधारित धोरणानुसार जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी या उपक्रमास गती दिल्याने नाशिक जिल्ह्यातून गट ‘क’ संवर्गात १०० उमेदवार व गट ‘ड’ संवर्गात ९६ उमदेवार अशा एकूण १९६ उमेदवारांना अनुकंपातत्वावर, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क मधील लिपिक नि टंकलेखक परीक्षेच्या माध्यमातून २८९ असे एकूण ४८५ उमेदवारांना शासकीय नोकरीची संधी मिळाली आहे. ते लवकरच आपल्या आयुष्याची नव्याने सुरूवात करणार आहेत. शनिवार ४ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या रोजगार मेळाव्यात या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अनुकंपा भरतीची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे.
शासकीय सेवेत कार्यरत असताना अधिकारी व कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबावर ओढवणाऱ्या आपत्तीतून कुटुंबीयांना सावरण्यासाठी कुटुंबातील एका सदस्यास अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागते. अशा या संवेदनशील विषयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला सूचना केल्या. सातत्याने प्रशासकीय बैठकांमध्ये त्याचा आढावा घेतला आणि नवीन अनुकंपा धोरण तयार करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून अनुकंपा प्रतीक्षा यादीतील जिल्ह्यातील १९६ उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. यामुळे अनुकंपाचा एक मोठा अनुशेष संपुष्टात येणार आहे.
४ ऑक्टोबरला मुख्य कार्यक्रम हा मुंबईत होईल आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असतील. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे वितरणाचा कार्यक्रम होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी १०० दिवस आणि नंतर १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या हाती घेतलेल्या कार्यक्रमातील हा महत्त्वाचा टप्पा होता.
तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक नि टंकलेखक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार प्रशासनाने गतीने ही प्रक्रिया राबविली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात १ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या मेळाव्यात उमदेवारांना शासन निर्णय व नियुक्ती प्रकियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते. यात अनुकंपा तत्वावर गट-‘क’ पदाकरिता यादीतील १०० उमेदवार व गट- ‘ड’ पदाकरिता ९६ उमेदवारांची नियुक्तीकरिता शिफारस करण्यात आली आहे. याबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून गट ‘क’ संवर्गात २८९ एवढ्या उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना शनिवार ४ ऑक्टोबर २०२५ रोजी महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक येथे होणाऱ्या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील विविध कार्यालयांच्या आस्थापनेवर नियुक्तीपत्र देण्यात येईल.
मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेस गती आणून पात्र उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे हा प्रमुख उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले.