नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानित खते आयएफएमएस (Intergrated Fertilizer Manegment System) प्रणालीवर विक्री केले जातात. आता ॲग्रीस्टॅक प्रकल्पांतर्गत शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) हे आयएफएमएस प्रणालीला जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी नाशिकची पथदर्शी जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे.
रासायनिक खतांचा गैरवापर थांबविणे, योग्य गुणवत्तेचे खत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, खतांच्या गरजेनुसार योग्य पुरवठा निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारच्या खत विभागाने राज्यातील नाशिकसह वर्धा जिल्ह्याची पथदर्शी प्रकल्पासाठी निवड केली आहे. नाशिक जिल्ह्याचे कृषी क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान आहे. जिल्ह्यात भाजीपाला, फळांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याची निवड करण्यात आली असून २ ऑक्टोबर २०२५ पासून या पथदर्शी प्रकल्पाची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येईल.
या पथदर्शी प्रकल्पांतर्गत खतांची विक्री प्रचलित पद्धतीनेच होईल. तूर्तास शेतकरी ओळखपत्र नसलेल्या व्यक्तींनाही खत मिळेल. प्रत्यक्ष शेतकरी ओळखपत्र असलेले किती शेतकरी अनुदानित खताचा वापर करतात याबाबींची नोंद या प्रणालीच्या माध्यमातून केली जाणार आहे. अनुदानित खते खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांनी खरेदीची पावती सुरक्षितपणे आपल्याजवळ ठेवून घ्यावी. तसेच अन्य सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक प्रकल्पांतर्गत शेतकरी ओळखपत्राची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.