नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विकसित महाराष्ट्र २०४७ पर्यंतचे धोरण निश्चितीसाठी खेळाडू, संघटक, प्रशिक्षक यांच्यासमवेत संवाद साधण्यात येत आहे. राज्याचे क्रीडा धोरण तयार करताना खेळाडूंच्या हिताचा विचार करून सर्वसमावेशक क्रीडा धोरण तयार करण्यात येईल. खेळाडूंना आवश्यक सोयीसुविधा वेळेत उपलब्ध होतील, अशी ग्वाही क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी येथे दिली.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे आज सकाळी गुरू दक्षिणा सभागृहात विकसित महाराष्ट्र 2047 युवा व क्रीडा संवाद (नाशिक विभाग) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा आयुक्त शीतल उगले- तेली, अर्जुन पुरस्कार प्राप्त धावपटू कविता राऊत, आंतरराष्ट्रीय नौकानयनपटू दत्तू भोकनाळ, क्रीडा उपसंचालक संजय सबनीस, स्नेहल साळुंखे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील (नाशिक), रवींद्र नाईक (जळगाव), मनोहर पाटील (धुळे) आदी उपस्थित होते.
मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, राज्य शासनाने नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवत क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिले आहे. देशांतर्गत विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचा संघ अव्वल राहिलेला आहे. या पार्श्वभूमीवर सन २०४७ पर्यंतचे क्रीडा धोरण तयार करताना सर्व सूचना, अभिप्राय विचारात घेतले जातील. त्यासाठी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयांमध्ये सूचना पेटी बसविण्यात येईल. जिल्हा क्रीडा संकुलांच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. नंदुरबार येथे सिथेंटिक ट्रॅक उपलब्धतेसाठी आठ दिवसांत कार्यवाही करण्यात येईल.
खेळांच्या विकासासाठी हरियाणा, ओडिशा राज्य करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. खेळाडू, प्रशिक्षकांना देण्यात येणारे पुरस्कार वितरणासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात येईल. मैदाने विकसित करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. त्याबरोबरच आवश्यक साधनसामग्री, साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. क्रीडांगण विकासासाठीचा निधी वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे क्रीडा मंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले.
क्रीडा आयुक्त श्रीमती तेली म्हणाल्या की, क्रीडा धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. त्यात आता सुधारणा करण्यात येत आहेत. त्यासाठी सूचना आणि अभिप्राय मागविण्यात येत आहेत. राज्य शासनाने क्रीडा क्षेत्राला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. राज्य शासनाने 118 खेळाडूंना शासकीय नोकरीत सामावून घेतले आहे. राज्य क्रीडा विकास निधीची स्थापना करण्यात आली आहे. मिशन लक्षवेध अंतर्गत 12 खेळांची निवड करण्यात आली आहे. तेथे अत्याधुनिक सुविधा, साधने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना प्रशिक्षित करून उद्याचे ऑलिम्पिकवीर घडतील आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत घडण्यास मदत होईल. आगामी काळात क्रीडा विभागाच्या कामकाजात एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या धावपटू कविता राऊत, नौकानयनपटू ऋषिकेश शिंदे, पूजा तांबे, कौसल्या पवार, श्रीमती शैलजा जैन, बळवंत निकुंभ, खुशाल शर्मा, मयूर ठाकरे, प्रणव गावित, कविता पाटील (नंदुरबार), ॲड. गोरख बलकवडे, मंदार देशमुख, डॉ. मीनाक्षी गवळी, हेमंत पाटील, सागर बोडके, संजय चव्हाण (नाशिक), उमेश चौधरी, आनंद पवार, मोसिन शेख, संजय भामरे (धुळे), राजेंद्र जाधव, राजवीरसिंह राजपूत, प्रशांत कोल्हे, काजल भाकरे (जळगाव) आदींनी विविध सूचना केल्या. त्यांनी सांगितले की, विविध खेळात कामगिरी, क्रीडा सुविधा मिळाव्यात, आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान व्हावे, सरावासाठी सुविधा, नंदुरबारला स्वतंत्र क्रीडा प्रबोधिनी, क्रीडा संकुलास कायमस्वरूपी निधी, शाळांमध्ये क्रीडा शिक्षक भरती करावी, प्रशिक्षक नियुक्त करावेत, श्री छत्रपती पुरस्कार विजेत्यांना टोल माफी मिळावी, एक जिल्हा एक संघटना करावी, क्रीडा विभाग वेगळा करावा, क्रीडा अनुदान सुरू करावे, डोपिंग चाचणीची व्यवस्था निर्माण करावी, क्रीडा स्पर्धा आयोजनाचा खर्च वेळेत मिळावा, 250 विद्यार्थ्यांमागे एक क्रीडा शिक्षक नियुक्त करावा, क्रीडा संघटना सक्षम कराव्यात, शालेय मैदानांना सुविधा मिळाव्यात, खेळाडूंना प्रवासात सवलत द्यावी, गाव तेथे क्रीडांगण असावे, विद्यापीठांचे क्रीडा धोरण असावे, प्रतिभावान खेळाडूंना वेळीच मदत करावी, खेळाडूंसाठी स्वतंत्र वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आदी सूचना केल्या.