मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या लगत उपलब्ध जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय होणार असून या जागेवरील वनविभागाचे आरक्षण रद्द व्हावे, यासाठी गतीने काम केले जावे, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
मंत्रालयात नाशिक येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस वन मंत्री गणेश नाईक, वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बांगल आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयासाठी शासनाच्यावतीने मंजुरी देण्यात आली आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या लगत सदर जागेवर महाविद्यालय होणार असून यासाठी अतिरिक्त जागा देखील शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यापीठ आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने यादृष्टीने समन्वयाने कार्यवाही करावी असे मंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
वन मंत्री श्री. नाईक म्हणाले, जनहिताच्या दृष्टीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार आहे. सदर जागेवरील वनविभागाचे आरक्षण रद्द करण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी तातडीने प्रस्ताव द्यावा. प्रस्ताव प्राप्त होताच वन विभागाकडून कार्यवाही करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक निकालानुसार वनविभागाकडून, अशा जागेसाठी नियमितीकरण प्रक्रिया करण्यात येते.