बंद मंदिरात आरती करणे भोवले
नाशिक : बंद मंदिरात शिरून गणपतीची आरती करणे सिडकोतील तरूणांना चांगलेच महागात पडले आहे. मनाई आदेश आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाचे उलंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.योगेश नामदेव दराडे,स्वप्नील प्रभाकर चिंचोले (रा. दोघे अश्विननगर),विक्रांत उल्हास सांगळे,संतोष पांडूरंग काकडे व आनंद बाळीबा घुगे (रा.तिघे मोरवाडी गाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप देवदर्शनावर बंदी आहे. महामारीची संभाव्य तिस-या लाटेकडे वाटचाल सुरू असतांना संशयीतांनी रविवारी (दि.१८) दुपारच्या सुमारास गंगापूररोडवरील नवश्या गणपती मंदिर गाठून हे कृत्य केले. नवश्या गणपती मंदिरात जावून संशयीतांनी देवदर्शन करून आरती केली. याप्रकरणी पोलीस नाईक प्रशांत धाबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बच्छाव करीत आहेत.
मारहाण करीत पोलीसाचे कपडे फाडले
नाशिक : लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करून लसीकरण केंद्रावर गोंधळ घालणा-या एकाने पोलीस कर्मचा-यास मारहाण करीत वर्धीवर हात टाकल्याचा प्रकार नाणेगाव येथे घडला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरख सखाराम आडके (४५ रा.नाणेगाव ता.जि.नाशिक) असे संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्पचे हवालदार विवेक साळवे यांनी तक्रार दाखल केली आहे. नाणेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कोव्हीड – १९ लसीकरण केंद्र आहे. सोमवारी (दि.१९) हवालदार साळवे व शिपाई गोरे या केंद्रावर बंदोबस्तावर असतांना ही घटना घडली. या केंद्रावर सकाळच्या सुमारास नागरीकांनी रांगा लावलेल्या असतांना संशयीताने थेट लसीकरण ठिकाण गाठून लस टोचण्याचा आग्रह धरला. यावेळी अन्य नागरीकांचा विरोध लक्षात घेवून साळवे यांनी संबधीतास समजविण्याचा प्रयत्न केला असता त्याने मी लष्करातील तीन स्टार अधिकारी आहे असे म्हणून गोंधळ घातला. यावेळी त्याने साळवे यांना शिवीगाळ व झटापटी करीत थेट हाताच्या चापटीने मारहाण केली. यावेळी झालेल्या झटापटीत वर्दीवरील साळवे यांचे कपडे फाटले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गिते करीत आहेत.
मखमलाबादला तडिपार जेरबंद
नाशिक : शहर आणि जिह्यातून हद्दपार असतांना शहरात वावर ठेवणा-या तडिपारास पोलीसांनी मखमलाबाद गावात बेड्या ठोकल्या. संशयीता बस स्टँड परिसरात राजरोसपणे फिरत होता. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय शिवाजी मिसाळ (रा.बजरंगनगर आनंदवली) असे अटक केलेल्या तडिपाराचे नाव आहे. मिसाळ याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यास शहर आणि जिह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर असतांना पोलीस शिपाई योगेश शिरसाठ यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सोमवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास संशयीत मखमलाबाद बस स्टॅण्ड भागात येणार असल्याच्या माहितीवरून सापळा लावला असता तो पोलीसांच्या जाळ््यात अडकला. याप्रकरणी शिरसाठ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक रहेरे करीत आहेत.