अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईत देशाला आणखी एक प्रभावी उपाय मिळाला आहे. मुंबईमधील ग्लेनमार्कने या फार्मास्युटिकल कंपनीने कॅनडाच्या सॅनोटाईझ कंपनीच्या सहकार्याने ‘फॅबिस्प्रे’ या नावाने नायट्रिक ऑक्साइड नेझल स्प्रे तयार केला आहे. या स्प्रेचा वापर कोरोना विषाणूची लागण झालेल्या प्रौढ रुग्णांवर उपचार करण्यात येणार असून अवघ्या दोन मिनिटात या विषाणूचा नायनाट त्यातून करता येणार आहे. फार्मास्युटिकल कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, “हे स्प्रे श्वसनमार्गाच्या वरच्या भागातच विषाणू नष्ट करते. अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असलेले हे औषध SARS-CoV-2 विषाणूला दूर करण्यासाठीही अतिशय प्रभावी आहे. नाकात जेव्हा हे औषध आपण टाकतो तेव्हा विषाणूसाठी भौतिक आणि रासायनिक अडथळा तयार होतो आणि विषाणूचा नायनाट होतो तसेच हा स्प्रे फुफ्फुसांमध्ये विषाणूला पसरण्यापासून रोखतो.
औषध महानियंत्रक अर्थात डीसीजी आयने या नेझर स्प्रेच्या उत्पादनासाठी आणि वितरण करण्यासाठी परवानगी दिली आहे. कंपनीने जाहिर केलेल्या माहितीनुसार फॅबिस्प्रेच्या देशात तीन टप्प्यांमध्ये चाचण्या करण्यात आल्या आहेत. हा स्प्रे २४ तासांतच नाकामधील विषाणूचे प्रमाण सुमारे ९४ टक्क्यांनी तर ४८ तासांत ९९ टक्क्यांपर्यंत कमी करत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. केवळ नाकात स्प्रे करुन कोरोनाचा नायनाट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या विषाणूचा श्वसननलिका आणि फुप्फुसांना संसर्ग होण्यापासून रोखता येणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गाने सर्वांनाच हैराण केले असल्याने, अशी संशोधने सामान्य माणसाला दिलासा देणारी ठरत आहे. या स्प्रेमुळे कोरोनाचा नायनाट अवघ्या काही वेळात होणार असल्याने दवाखाने, औषधांच्या खर्चामध्येही बचत होणार असल्याचे मानले जात आहे.