नाशिकरोड – खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक सहकारी साखर कारखान्याचा चाचणी गळीत हंगाम यशस्वी झाल्यानंतर पुढील हंगामाची जोरदार तयारी सुरु झाली आहे,आगामी काळात कारखान्याला ऊस कमी पडू नये या उद्देशाने कारखाना कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या काही ठिकाणी आज दिनांक ४ जूनपासून तीन दिवस ऊस परिसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून कृषीविषयक तज्ञ मार्गदर्शन करणार असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली.
नाशिक सहकारी साखर कारखाना २५ वर्षासाठी खा हेमंत गोडसे व उद्योजक दीपक चंदे यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून भाडेतत्वावर चालविण्यास घेतलेला आहे, अवघ्या दीड महिन्यात कारखान्याची दुरुस्ती करून चाचणी गळीत हंगाम यशस्वी केलेला आहे, कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता १२५० मेट्रिक टना वरून २५०० मेट्रिक टन प्रति दिनी करण्यात येणार आहे, याशिवाय इथेनॉल व डिस्टलरी यासारखे उपपदार्थ देखील निर्मिती केली जाणार आहेत. शेतकऱ्यांनी तंत्रशुद्ध पद्धतीने ऊस लागवड करून जास्तीत जास्त टनेज कसे मिळवावे याचे मार्गदर्शन करणेकामी नाशिक, सिन्नर, इगतपुरी या तीनही तालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणी ऊस परिसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे, या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे ऊस विशेतज्ञ एस बी माने यांचेसह नाशिक तालुका कृषी अधिकारी रवींद्र वाघ, सिन्नर तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, इगतपुरी तालुका कृषी अधिकारी एस पी तवर हे सहभागी होणार आहेत. ऊसाच्या जाती, उसाची लागवड या संदर्भात आधुनिक पद्धतीची माहिती या मेळाव्यात दिली जाऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यातील परिसंवाद मेळाव्याची सुरुवात आज ४ जून रोजी सकाळी ८ वाजता गिरणारे येथील गंगाराम मामा थेटे मंगल कार्यालयात होणार असून यावेळी ऊस विषयतज्ञ एस बी माने, खा हेमंत गोडसे, आ हिरामण खोसकर, नाशिक तालुका कृषी अधिकारी रवींद्र वाघ, कारखान्याचे कार्यकारी संचालक व्ही एस बाविस्कर, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ वाजता लाखलगाव येथील माधवराव बोरस्ते हायस्कूल तर सायंकाळी ५ वाजता पळसे येथील मारुती मंदिर व सायंकाळी ७ वाजता भगूर येथील मातोश्री लॉन्स येथे मेळावे घेतले जाणार आहेत. ५ जून रोजी सकाळी ८.३० वाजता साकुर, सकाळी १० वाजता सिन्नर तालुक्यातील कोनांबे मारुती मंदिर तर सायंकाळी ५ वाजता मुसळगाव येथील मारुती मंदिरात मेळावा होईल, ६ जून रोजी सकाळी ८.३० वाजता सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे गोदा युनियन पटांगणात, सकाळी १० वाजता वडांगळी येथील मारुती मंदिर व सायंकाळी ५ वाजता नांदूर वैद्य येथील भैरवनाथ मंदिरात मेळावा घेतला जाणार आहे, या सर्व ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी सह विविध मान्यवर मार्गदर्शन करतील कारखाना सुरळीत चालावा त्याला गतवैभव प्राप्त व्हावे व त्यातून शेतकऱ्याचे हित जोपासावे ही त्यामागील भावना असून सर्व मेळाव्यांना शेतकरी व ऊस उत्पादकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे शेतकी अधिकारी जगन्नाथ जगताप, ऊस विकास अधिकारी अरुण पाटील यांनी केले आहे.